जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरात गटारींवरील कन्व्हर्टर बांधकामासाठी लागणारे साहित्य, सुमारे २०० किलो आसारी चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, “शहरातील श्रद्धा कॉलनीतील रहिवासी मनोज सुनिल पाटील (वय-२४) हे गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांनी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील शिवाजीनगर, हमालवाडा, हुडको परिसरातील आरसीसी व स्लॅब कल्व्हर्ट बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे. दरम्यान शिवाजी नगर व हमाल वाड्यातील गटार व स्लॅबचे कामकाज चालू आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य या प्रभागातील नगरसेविका गायत्री शिंदे यांच्या घरासमोर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी ठेवले होते.
बुधवार, दि.२३ रोजी सकाळी मनोज पाटील व त्यांचे वडील सुनिल पाटील हे काम आटोपून सायंकाळी मनोज पाटील हे घरी गेले तेव्हा त्याठिकाणी आसारी पडल्या होत्या. दरम्यान, गुरुवार, दि.२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचे वडील पुन्हा त्याठिकाणी गेले असता, त्यांना तेथे आसारी दिसून आली नाही. त्यांनी याबाबत नगरसेविकेचे पती उत्तम शिंदे यांना विचारले असता त्यांना देखील काहीच माहित नव्हते.
बर कॉन्ट्रॅक्टर विनोद यांना आसारीबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, माझ्याकडील साहित्य अनेकवेळा चोरीस गेले आहे. त्यांनी संपूर्ण परिसरात आसारीचा शोध घेतला. मात्र त्या मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ११ हजार २०० रुपयांची आसारी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.