राज्यात ५४ लाख नोंदी आढळल्याने सरसकट आरक्षण द्या : जरांगे

आंतरवाली सराटी-वृत्तसेवा | राज्यात आतापर्यंत तब्बल ५४ लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी आढळल्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनो ज जरांगे पाटील यांनी केले. आज आंतरवाली सराटी येथे समाजबांधवांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठा समाजातील धुरिणांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी सरकारला जास्तीचा वेळ देणार नसल्याची भूमिका व्यक्त केली आहे. शिवाय सापडलेल्या ५४ लाख नोंदींच्या आधारावर राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी स्पष्टपणे केली.

बैठकीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ’’आता आपल्याला गुलालच घ्यायचा आहे, यात माघार नाही. धनगर आणि वंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण असल्याने यामध्ये त्यांचा काहीच प्रश्न नाहीये. मिळालेल्या कुणबी नोंदींच्या आधारावर अहवाल बनवून आरक्षण देण्याचा सरकारचा शब्द आहे. राज्याच्या सगळ्यात मोठ्या कायदेतज्ज्ञांनी आम्हाला लिहून दिलं आहे आणि सरकारने ते मान्य केलं आहे. त्यांच्याच शब्दावर सरकारने आरक्षण देण्याची गरज आहे.’’

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आपलं आरक्षण ओबीसीकडे आहे, त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांचं आपल्याला एक इंचही नकोय. परंतु आपलं ते का खात आहेत? हा प्रश्न आहे. सरकार आरक्षण देईल, यात मराठ्यांना शंका नाही. परंतु आपल्याला सावध रहायचं आहे, त्यामुळे आजची बैठक बोलावली असल्याचे त्यांनी नमूद केले.

Protected Content