अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार !

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही क्षणाला अटक होण्याची शक्यता असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उलथा-पालथ होण्याची शक्यता आहे.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात तिसर्‍यांदा ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आता बळावल्याचे दिसून येत आहे. खर तरं केजरीवाल यांनी काल तपास यंत्रणेला पत्र लिहून ते राज्यसभा निवडणुका आणि प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत व्यस्त असल्याने ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार नसल्याचे सांगितले आहे. तथापि, त्यांना चौथ्यांदा समन्स बजावण्यात येईल असे मानले जात आहे. तर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांना ४ जानेवारी रोजी अटक करण्यात येईल असा दावा केला आहे.

केजरीवाल यांनी यापूर्वी २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर रोजी दोन समन्सवर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीसमोर हजर होण्यास नकार दिला होता. त्यांनी या नोटिसांना ’बेकायदेशीर’ आणि ’राजकीयदृष्ट्या प्रेरित’ म्हणून संबोधले होते. यानंतर त्यांनी तिसर्‍यांदा देखील या नोटिशीकडे दुर्लक्ष केले.

याआधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंह दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून त्यांच्या अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणात केजरीवाल यांना देखील अटक करण्याची शक्यता आता समोर आली आहे.

Protected Content