ज्ञानेश्‍वर माळींच्या कलेस अरूणभाईंची कौतुकाची थाप !

चोपडा प्रतिनिधी । कलाशिक्षक ज्ञानेश्‍वर माळी यांनी माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पेन्सील स्केच भेट दिले असून त्यांच्या कलेस अरूणभाईंनी कौतुकाची थाप दिली आहे. 

पालघर (कोकण) येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीचे म.नी.दांडेकर हायस्कूल पालघर विद्यालयातील कलाशिक्षक ज्ञानेश्‍वर माळी यांनी सपत्नीक चोपडा येथे प्रत्यक्ष जाऊन महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पेन्सिल स्केच सप्रेम भेट दिले.

या स्केचमध्ये अरुणभाईंचे  विद्वत्ताप्रचूर प्रसन्न हास्यरुप या सात्विक व्यक्तिमत्वाचे दर्शन मोजक्या ओघवत्या रेषेद्वारा हुबेहूब साकारले आहे. याप्रसंगी दि चोपडा बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी,जेष्ठ उद्योजक आशिष  गुजराथी,प्रसन्न  गुजराथी,प्रा.आशिष गुजराथी,प्राचार्य राजेंद्र महाजन (ललित कला केंद्र चोपडा ),प्रा.विनोद पाटील,जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कळसूत्रकार प्रा.दिनेश साळुंके,अक्षरशिल्पी जेष्ठ कलाशिक्षक वसंत नागपुरे,मिलिंद शहा,भगवान बारी,अतुल अडावदकर,प्रविण मानकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कलाशिक्षक ज्ञानेश्‍वर माळी यांनी कोरोना लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील १०० च्या वर मान्यवरांची व्यक्तिरेखांकने काढलेली आहेत.त्यातून मिळालेले एकूण रुपये ११,१११ त्यांनी कोविड १९- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले आहे.या १०० व्यक्तिरेखांकनांचे शतचित्राणी हे आगळेवेगळे पुस्तक स्नेही शिक्षक रविंद्र नाईक ( स.तु.कदम विद्यालय,पालघर ) यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ बंधू आर्किटेक्ट प्रमोद माळी व गुरुवर्य प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या कलात्मक अमूल्य मार्गदर्शनाने लवकरच जळगाव येथील अथर्व प्रकाशन मार्फत प्रकाशक युवराज माळी व सौ.संगिता माळी प्रकाशित करीत आहे.

या प्रकाशनास आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भास्कर उसपकर,संस्थेचे विश्‍वस्त भास्कर हाटे व गॉडफादर ज्ञानेश्‍वर कानडे, सेवानिवृत्त कलाशिक्षक प्रफुल्ल घरत,(माजी अध्यक्ष,पालघर जिल्हा कलाध्यापक संघ) श्री.प्रमोद पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

ज्ञानेश्‍वर माळी यांना अखिल भारतीय कलाध्यापक संघांमार्फत सांगली येथील राज्य अधिवेशनात मआदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे.पालघर रेल्वे स्टेशनचा परिसर त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने सुशोभित केला आहे.गरीब विद्यार्थ्यांना मदत, पूरग्रस्तांना मदत,मुक्या प्राण्यांना जीवनदान, रक्तदान शिबिर आयोजन, समाज प्रबोधनात्मक उपक्रम इ.माळी सरांनी राबवून यशस्वी केलेले आहेत.त्यांचा व्यक्तिचित्रण,निसर्गचित्रण, गणपती चित्रणात हातखंडा आहे.

ज्ञानेश्‍वर कौतिक माळी हे ललित कला केंद्र चोपडा या ग्रामीण भागातील मात्र महाराष्ट्रभर नावाजलेल्या कलासंस्थेचे सन १९९५ ते २००१ बॅचचे माजी विद्यार्थी आहेत.त्यांच्या शतचित्राणी व्यक्तिरेखांकन प्रस्तावित पुस्तकांचे अरुणभाई गुजराथी यांनी कलाशिक्षक माळी यांना कौतुकाची थाप देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.