माजी जि.प. सभापती, माजी बाजार समिती सभापती तथा राजकारण, सहकार व समाजसेवेतील मातब्बर व्यक्तीमत्व असणारे बळीरामदादा तोतारामजी सोनवणे हे नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्यासह सोनवणे कुटुंबियांशी दीर्घ काळापासून निकटचे संबंध असणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी दादांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा !
जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बळीराम दादा सोनवणे यांचे नुकतेच निधन झाले, त्यानां माझी भावपूर्ण श्रद्धांजली…ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीर शांती प्रदान करो….! एक शेती निष्ठ शेतकरी, नावलौकिक प्राप्त कुस्तीपटू, स्वयं शिस्त व कुटुंबवत्सल गृहस्थ, संयमित राजकारणी अश्या गुण वैशिष्टयांचे धनी बळीराम दादा काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांनी केलेल्या कार्यामुळे दादा कायम स्मरणात राहणार आहेत.
दिवंगत बळीरामदादा सोनवणे यांचा जीवनपट अतिशयद प्रेरणादायी म्हणता येईल. जळगाव तालुक्यातील सुजदे या लहानश्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादांचा जीवन प्रवास लौकिकार्थाने स्वयंभू शहेनशहा सारखा राहिला आहे. त्यांच्या सोनवणे कुटुंबाची ओळख देखील एखाद्या वटवृक्षा प्रमाणेच असल्याचे दिसून येते. सहा भावंडे अनुक्रमे कै. सीताराम दादा, पंडितराव, वसंत अण्णा, डॉ. शांताराम दादा, कै. मुरलीधर सोनवणे आणि दोन बहिणी, असं हे भलं मोठं कुटूंब सामाजिक दृष्टया आपली वेगळी ओळख ठेवून आहे !
आपले वडील बंधू सीताराम दादा सोनवणे यांचा राजकीय वारस पुढे नेण्याचे काम बळीराम दादा यांनी स्वबळावर यशस्वी करून दाखविले. जळगाव मधील सागर शाळेतून दहावी पर्यंत
शिक्षण पूर्ण करून उत्तम शेती करीत त्यांनी क्रीडा क्षेत्रात ही आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला.
उत्कृष्ट व्हॉली बॉल, कबड्डी खेळाडू म्हणून त्यांची आजही क्रिडा क्षेत्रात आठवण केली जाते.
बळीराम दादा यांनी व्हॉली बॉल, कबड्डी क्षेत्रात जेवढं नाव कमवल त्याही पेक्षा त्यांनी अजिंक्य कुस्तीगीर म्हणून कुस्ती या क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात आपला लौकिक कायम केला. त्यांचे कुस्ती क्षेत्रातील डावपेच आणि कसब लक्षात घेता त्यांना अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण संस्थेने महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून घोषित केले होते. अगदी वयाच्या ४५ वर्षा पर्यंत कुस्ती खेळाची आवड त्यांच्यात कायम होता. याचमुळे त्यांची पिळदार शरीरयष्टी ही कौतुकाचा विषय बनली होती. अगदी अलीकडच्या काळापर्यंत त्यांची व्यायामाप्रती आवड असल्याचे दिसून आले होते.
बळीरामदादा यांनी राजकीय आणि सहकार या क्षेत्रातील अनेक पदे भूषविली. स्थानिक संस्थांच्या राजकारणातील त्याची पकड विलक्षण म्हणता येईल. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समिती चे ते तब्बल १४ वर्षे सभापती होते. त्यांच्या काळात बाजार समितीत शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद सदस्य ते सभापती पदी ही त्यांनी भूषविले. त्यांनी आपल्या पत्नीस ही जिल्हा परिषदेत निवडून आणले होते. मात्र वाढत वय आणि आपल्या मुलांची यशस्वी वाटचाल लक्ष्यात घेत ते गेल्या दहा वर्षां पासून राजकारणातुन दूर झाले होते. स्पष्ट वक्ता, संयमित भाषा, बडेजाव किंवा प्रसिद्धी पासून ते नेहमीच अलिप्त राहिले.
बळीराम दादा सोनवणे यांनी जे वलय व जी प्रतिष्ठा मिळविली तीच परंपरा त्यांच्या मुलांनी नुसती कायम ठेवली नाही तर यात वृध्दी केली. त्यांना चार मुले अनुक्रमे प्रा. माजी आमदार चंद्रकांत, श्याम, नरेश आणि डॉ किरण हे आपापल्या क्षेत्रात आपला प्रभाव ठेऊन आहेत. सर्व मुलं-मुली उच्च शिक्षित आहेत. यातील अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आमदारकी भूषविली असून आता त्यांच्या सौभाग्यवती लताताई या आमदार आहेत. त्यांच्या स्नुषा राखीताई सोनवणे यांनी जळगावच्या प्रथम नागरिक अर्थात महापौरपदाची जबाबदारी पार पाडली आहे.
सोनवणे कुटुंब हे शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर आहे. प्रा. चंद्रकांत सोनवणे हे वरिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य, तर डॉ.किरण वैद्यकीय क्षेत्राची उच्च पदवी एम.डी. संपादीत केली आहे. तर आज त्यांची नातवंडे देखील विविध क्षेत्रांमध्ये उच्चशिक्षर घेत असल्याचे दिसून येत आहे. दिवंगत बळीराम दादा सोनवणे व त्यांच्या कुटुंबाने जी सामाजिक , राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात जेवढी भरारी व लौकिक मिळविला आहे, तसे जिल्ह्यात तरी दुसरे उदाहरण नाही. आज बळीरामदादा आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी केलेले कार्य व प्रगतीचा विचार हा कायम येणार्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांना चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
सुरेश उज्जैनवाल, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव