चोपड्याचे माजी आमदार तथा वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा अमीट ठसा उमटवणारे डॉ. सुरेशदादा जी. पाटील आज वयाची ९४ वर्षे पूर्ण करत आहेत. याचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख आपल्यासाठी सादर करत आहोत.
काही सामान्य माणसे कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसतांना केवळ स्वकर्तृत्वाने मोठी होतात.त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ.दादासाहेब सुरेश जी. पाटील आहेत. अमळनेर तालुक्यातील अमळगाव हे एक खेडेगाव. सामान्य कुटुंब श्री.गंभीर व सौ.नर्मदा पाटील यांच्या पोटी एक रत्न जन्मास आलं. तो काळ होता १८ नोव्हेंबर १९२५ चा.म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ. पुढे ह्या अनमोल रत्नाने चोपडाच नाही तर पूर्णं महाराष्ट्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. दादासाहेब म्हणून आजही त्यांना सर्व जण आदराने ओळखतात. दादासाहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चोपडा तालुक्यातील हातेड येथेच झाले .पुढे वैद्यकीय शिक्षण बडोदा, गुजरात येथे केले. अडलेल्या नडलेल्यांना रात्रीबेरात्रीही दादासाहेब आपल्या परीनं मदतीसाठी तयार राहत. दादासाहेबांनी चोपडा येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा दिली.कधीही पैशांअभावी रुग्णांकडे दुर्लक्ष केले असे कोणीही सांगणार नाही. नि:स्वार्थपणे मनोभावी सेवा दिली.कधीकधी तर खेड्यातून आलेल्या रुग्णांकडे भाडंही नसायचं तेव्हा विचारपूस करून दादा भाड्यासाठी पैसेही द्यायचे. परिसरातील पाड्यांतल्या, डोंगरकपारींतून आलेल्या आदिवासी, गरिबांची, गरजू लोकांची मनापासून सेवा केली. यातून मानवतावादी डॉक्टर म्हणून असलेल्या विश्वासाला दादा पात्र ठरलेत .असा दर्यादिल अवलिया या परिसराला लाभला म्हणून कित्येक लोक दादासाहेबांचं मनापासून ॠण व्यक्त करताना दिसतात.
भुतकाळाचं भान,वास्तवाचं ज्ञान आणि भविष्याचं विज्ञान जाणणार्या दादांचा विवाह नामपूर ता.सटाणा जि.नाशिक येथीलधर्मराज जयदेवराव सावंत व सौ.वासंतिकाताई सावंत यांच्या उच्च शिक्षित थोरल्या कन्या शरदचंद्रिका पाटील यांच्याशी झाला. तशा त्या चोपडेकरांच्या अक्कासाहेब झाल्या.दादासाहेब सामाजिक क्षेत्रात पूर्णं गुंतले होते.त्यात अक्कासाहेबांचाही मोलाचा वाटा होता. सुखाचा संसार .त्यात तीन मुलं आणि दोन मुले असा पाच मुलांचा परिवार वाढला. शैलाताई, सुषमा ताई, डॉ.शेखरभैय्या,अँड.संदीपभैय्या,शुभांगीताई. तिघही मुली उच्च शिक्षित असून गृहिणी आहेत तर मोठे सुपुत्र डॉ.शेखर पाटील मुंबई येथे वैद्यकीय सेवा देत असून अँड.संदीपभैय्या हे सरकारी वकील होते.
डॉ. सुरेशदादा दूरदृष्टी असलेले नेते आहेत. गोरगरीबांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवं त्यासाठी शिक्षणव्यवस्था तयार केली पाहीजे असे दादांच्या व आक्कांच्या लक्षात आले.त्याकडे दादा झपाट्याने वळले. दादासाहेबांनी तत्कालीन तालुक्यातील समविचारी शिक्षणप्रेमी मंडळींना आपला विचार पटवून दिला.त्यातूनच १९६९ मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना केली. या माध्यमातून कला,शास्र व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय सुरु झाले. शिक्षणाची गंगा चोपडावासियासाठी दारी आली .अक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळा,चोपडा येथील वरिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील वनस्पतीशास्त्र विभागात मानद प्राध्यापक म्हणून सेवा दिली. या संस्थेची आज मोठी भरभराट आज पहायला मिळतेय. इवलंसं रोपटं गगनाचा शोधार्थ निघालंय. ही सगळी दादासाहेबांची पुण्याई ! दादासाहेबांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत पदविका,पदवी व पदव्युत्तर औषध निर्माण महाविद्यालय, तंत्रनिकेतन पदविका विद्यालय,शिक्षण शास्र विद्यालय,नर्सिंग विद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण विद्यालय,महात्मा गांधी व कस्तुरबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,ऑक्सफर्ड इंग्लिश मेडियम स्कुल आदी शैक्षणिक विद्या शाखा सुरु केल्यात.तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कर्जाणे येथे वि.प्र. देशमुख पोस्ट बेसिक आश्रम प्राथमिक,माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय सुरु केलेत. तालुक्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी त्या अनुषंगाने प्रशिक्षित करण्यासाठी जन शिक्षण संस्थेची स्थापना करून विविध प्रशिक्षण दालने सुरु करून जनशिक्षणाचे कार्य सुरू केले. आज माणसं ध्येयानं वेडी होण्यापेक्षा पैशानं वेडी होत आहेत.श्रमाने मिळणार्या पैशावर आज कोणाचा फारसा विश्वास राहिलेला नाही.कारण त्यासाठी वेळ लागतो.अशा आजच्या परिस्थितीत अलिप्त राहून व्रतस्थ वृत्तीने कार्य करणार्या दादासाहेबांचं जीवन म्हणजे तरूण पिढींसाठी दीपस्तंभासारखेच आहे.
अपार सेवाभावी वृत्तीचे दादासाहेब गोरगरीबांशी अगदी जवळीकीने वागत.चोपडेकरांनीही दादासाहेबावर खूप प्रेम केलंय .आपली गार्हाणी दिलखुलासपणे दादासमोर मांडत. दादाही त्यांचे निराकरण करत. समाजकारणाबरोबर राजकारणाचा पिंडही दादा व सौ.आक्कांचा होता. शरदचंद्रिका पाटील यांना १९८२ साली तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.अनेक निर्णय अक्कासाहेबांनी घेतले.परंतू निर्दयी काळाने घात केला. अक्कासाहेब आपल्याला पोरके करुन गेल्या.५ डिसेंबर १९८२ रोजी त्यांचे हृदयविकाराने दुर्दैवी निधन झाले.दादांच्या अंत:करणाचा नंदादीपाची ज्योत मालवली. दादासाहेब दुःखी झाले.उमेदीच गारद झाल्यासारखे. पण लोकांच्या आग्रहाखातर उभे राहीले.लोकांच्या प्रेमापोटी न डगमगता आणि १९८२ साली कै.ना.सौ.अक्कासाहेब शरदचंद्रिका पाटील यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी झालेल्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील विधान सभेवर निवडून गेलेत.
दादांना सहकारक्षेत्राची जाण होतीच. यामुळे त्यांनी सूतगिरणी सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. सूतगिरणीसाठी भागभांडवल गोळा करून खाचणे शिवारात जमीन खरेदी केली. साखरकारखाना निर्मितीकामी आप्पासाहेब धोंडू उखाजी पाटील यांना सहकार्य केले.कै.ना.सौ.अक्कासाहेब शरदचंद्रिका पाटील मंत्री असतांना गुळ मध्यम प्रकल्प मंजूर करून घेतला होता. याचा आज मोठ्या प्रमाणात लाभ होतांना दिसून येत आहे. तालुक्यातील गावागावातदादांना मानणारी व विश्वासास पात्र असणारी मोठीच फळी आहे.दादांचा कार्यकर्ता निस्पृह,निस्वार्थी व प्रामाणिक आहे. दादा तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यास नावाने ओळखतात. दादासाहेबांचा वैद्यकीय वारसा त्यांचे सुपुत्र डॉ.शेखर सुरेश पाटील व त्यांच्या अर्धांगिनी डॉ.सौ.उषाताई शेखर पाटील तसेच अँड.संदीप सुरेश पाटील यांच्या अर्धांगिनी डॉ.स्मिताताई संदीप पाटील चालवत आहेत.
दादासाहेबांचा व अक्कासाहेबांचा राजकीय व शैक्षणिक कार्याचा वारसा त्यांचे लहान सुपुत्र भैय्यासाहेब अँड.संदीप सुरेश पाटील हे चालवत आहेत. त्यांनी चोपडा न.प.अध्यक्ष पद भूषवले असून, सध्या ते जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा-अध्यक्ष,जन शिक्षण संस्था,चोपडा-अध्यक्ष; कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य आदी पदे समर्थपणे सांभाळत आहेत. तसेच अक्कासाहेबांच्या बंधूंच्या कन्या सौ.सुप्रियाताई सनेर या चोपडा न.प.च्या सध्या उपाध्यक्षा आहेत.
दादासाहेब आजीवन काँग्रेस पक्षाचे व गांधी विचारांचे पाईक राहिलेत.साधी राहणी. प्रसिध्दीच्या झगमगाटापासून कोसोदूर राहीले. काँग्रेस पक्षाने अनेक चढ-उतार पाहिलेत पण दादासाहेबांनी काँग्रेस पक्षाची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्यांच्यासारखा एकनिष्ठ व एकवचनी नेता आज दिसत नाही. अर्थात, याच गुणांमुळे आज शतकाकडे वाटचाल करणारे दादा हे समाजाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले आहेत.
दि.१८ नोव्हेंबर १२०१८ रोजी दादासाहेबांनी वयाची ९४ वर्ष पूर्ण करून ९५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.आमच्या चोपडावासियांचं वैभव आहे.दैवत आहेत.शरीर थकलंय पण मन आजही तसंच .त्यांच्या बोलण्यात तारुण्य ओसंडतं .आजही कुठल्या खेड्यापाड्यावरचा कधीनाकधी त्यावेळी भेटलेला कार्यकर्ता भेटला की मनभरून बोलतात.त्याकाळातील हिशेबच ठेवतात. त्यांची स्मरणक्षमता, आत्मविश्वास व इच्छाशक्ती दांडगी आहे. त्यांचा उत्साह आजही व उमेद लाजवणारी आहे.दादांचे चोपडा तालुक्यात वैद्यकीय ,शैक्षणिक ,सामाजिक ,सहकार व राजकीय क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे.
दादांचं सदा हास्यमुख पाहिल्यावर कितीही अडचणीत असलेला व्यक्ती आपले सारे दुःख विसरतो.आसरा शोधणारा दादांच्या कुशीत विसावा घेतो. त्यांचं चेहर्यांवरचं हास्य ही वरवरची देखणी आणि निरुपयोगी थोडीच आहे.वेळकाढूपणाची तकलादू अजिबात नाही.खरं म्हणजे दादा वास्तवाशी झुंज देवून जगले आणि इतरांना जगवलेही.त्यांच्या हास्यात नेहमी आश्वासक अशी सगळ्यासाठीची सुरक्षितता जाणवते. एक उत्थानाची ऊर्जानिर्मितीसाठीचा ऊर्जास्रोत म्हणून दादांकडे पाहीलं जाते.म्हणून तर दादांचा गोतावळा दांडगा आहे.जातधर्मापलीकडे त्याचं व्यक्तिमत्त्व आपल्याला खुलून दिसतं.त्यांचा सहवास आमच्यासाठी अमोल खजिनाच आहे अजातशत्रू दादांच्या दीर्घायुषीसाठी अभिष्टचिंतन करतो.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती ॥
-अशोक साळुंखे,
शिक्षक महात्मा गांधी विद्यालय चोपडा