औद्योगीक, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीमत्व असणारे अरूण श्रीपत नारखेडे यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा वेध.
अरूण श्रीपत नारखेडे हे मूळचे साळवा ता. धरणगाव (तत्कालीन तालुका एरंडोल) येथील मूळ रहिवासी. १५ नोव्हेंबर १९३६ रोजी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिल बंधू देवरामभाऊ नारखेडे हे ख्यातनाम गांधीवादी तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्व ! नारखेडे बंधूंनी उच्च शिक्षण घेतले. स्वत: अरूणजी हे पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. उत्तीर्ण झाले. मात्र नारखेडे बंधूंच्या वाढत्या वर्चस्वाने दुखावलेल्या काही तत्कालीन मान्यवरांनी कट करून त्यांना एका सामूहिक हत्याकांडात अडकावले. यात देवरामभाऊ नारखेडे यांच्यासह त्यांचे बंधू वामन आणि अरूण यांना देखील आरोपी करण्यात आले. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात हा खटला गाजला. यात देवरामभाऊ आणि वामन भाऊंना फाशी तर अरुण नारखेडे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र या खटल्यातील खोटेपणा आणि कट-कारस्थानांचा आयाम यथावकाश समोर आला. तसेच नारखेडे बंधूंनी कारागृहात उपोषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे पुढे नारखेडे बंधूंची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अर्थात, यासाठी तब्बल १० वर्षांचा कालावधी व्यतीत झाला होता. इतका मोठा काळ कारागृहात गेल्यानंतर आयुष्याची नव्याने सुरूवात करणे तितकेसे सोपे नव्हते. मात्र कठोर परिश्रम, सचोटी आणि समाजाभिमुख उद्यमशीलता याच्यामुळे अरूणजींनी वाटचाल सुरू केली. यातून त्यांनी यशोशिखर गाठले.
अरूणजी नारखेडे यांनी सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी सहकारी औद्योगीक वसाहतीमधील एक ऑईल मील विकत घेऊन त्यांनी १९७० हा अरूण सोप इंडस्ट्रीजची मुहूर्तमेढ रोवली. आणि यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. साबण, फिनाईल, ब्लीचींग पावडर आदींचे उत्पादन आणि विक्री यातून त्यांनी गुणवत्तेचा मापदंड प्रस्थापित केला. काळाच्या ओघात उद्योगात वैविध्य आणतांना त्यांनी पराग स्टील हे फॅब्रिकेशनचे युनिट सुरू केले. ते देखील अल्प काळात भरभराटीस आले. दरम्यान, एकीकडे उद्योजकतेतील यशाच्या पायर्या झपाट्याने चढत असतांना अरूणजींनी आपल्या कार्याचा पट हा अधिक व्यापक केला. सहकारी औद्योगिक वसाहतीची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. राज्य पातळीवर सहकारी औद्योगिक वसाहतींच्या फेडरशनच्या चेअरमनपदाची जबाबदारी देखील त्यांनी समर्थपणे पार पाडली. लेवा एज्युकेशनल युनियनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कामगिरी कुणी विसरू शकणार नाही. बहुजन समाजातील मुलींमध्ये शैक्षणिक क्रांती घडविणार्या या संस्थेच्या वाटचालीत अरूणजींचा मोलाचा वाटा असल्याचे कुणीही नाकारणार नाही.
अरूणजी यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पैलू हा त्यांच्यातील साहित्यगुणांचा आहे. त्यांनी विपुल लिखाण केले आहे.अरूणजींच्या लिखाणात वैविध्य आहे. अगदी वर्तमानपत्रांमधील प्रासंगीक लेखांपासून ते कादंबरी, कथा, काव्य, नाटक आणि विस्मय कथा अशी मुक्त मुशाफिरी त्यांच्या लिखाणातून आपल्याला दिसून येते. यातील वकिलाची उलट तपासणी आणि न्यायमूर्ती रामानंद या दोन कादंबर्यांचा विशेष उल्लेख आपल्याला करता येईल. साहित्य क्षेत्रातील दखलपात्र असणार्या कृती म्हणून त्यांची आधीच नोंद करण्यात आलेली आहे. खरं तर, अरूणजींनी रूढ अर्थाने कायद्याचे शिक्षण घेतलेले नसतांना त्यांनी याच क्षेत्रातील बारकावे टिपत दोन कादंबर्यांची केलेली निर्मिती ही विस्मयकारक आणि त्यापेक्षाही त्यांच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दर्शविणारी आहे. यातील वकिलाची उलट तपासणी आणि न्यायमूर्ती रामानंद या कादंबरी तर हिंदी आणि इंग्रजीतही अनुवादीत करण्यात आलेल्या असून अनेक साक्षेपी समीक्षकांनी त्याची महत्ता वर्णन केलेली आहे.
२००६ साली झालेल्या बहिणाबाई चौधरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची सार्थ निवड करण्यात आली होती. याप्रसंगी त्यांनी साहित्यावर केलेले मंथन हे अनेकांनी वाखाणले. अरूणजींची साहित्य संपदा हा अमूल्य ठेवा आहे. तर त्यांची अनेक हस्तलिखीते ही अप्रकाशित आहेत. एकीकडे उद्योजकता आणि एकूणच व्यवहार आयुष्यात यश संपादन करतांना अरूणजींनी त्यांच्यातील साहित्यिक गुणांची केलेली जोपासना ही अतिशय कौतुकास्पद अशीच आहे.
अरूणजी नारखेडे हे कौटुंबिक आयुष्यातही सुखी समाधानी आहेत. त्यांची दोन्ही मुले प्रा.डॉ.पराग आणि चंदन हे कर्तबगार निघाले असून कन्या जयश्री भगत या त्यांचा साहित्यीक वारसा पुढे चालवत आहेत. त्यांना परमेश्वर दीर्घ आयुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना….