मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मातंग समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. यामधील बऱ्याच मागण्या शासनाकडून पूर्णत्वास आणण्यात येत आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे कार्यालय अण्णाभाऊ साठे स्मारक, चिराग नगर, चेंबूर, मुंबई येथे असणार आहे. या कार्यालयाचा शुभारंभ १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी करण्यात यावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.
मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे उपस्थित होते. आर्टी संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज एका महिन्याच्या आत सुरूवात झाल्यास मातंग समाज बांधवांची ही मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. कार्यालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात यावे. याबाबत कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात यावे. या संस्थेची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी करण्याची प्रक्रियाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.