श्रीलंकेत अटक केलेल्या भारतीय पत्रकाराची सुटका

x19lOyPZ

श्रीलंका (वृत्तसंस्था) बॉम्बस्फोटानंतर वार्तांकन करण्यासाठी श्रीलंकेला गेलेल्या दानिश सिद्धीकी या भारतीय पत्रकाराची सुटका करण्यात आली आहे. तीनच दिवसांपूर्वी त्याला परवानगीशिवाय घटनास्थळाची तपासणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दानिश रॉयटर्स वृत्तसंस्थेचा पत्रकार आहे.

 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेत आठ बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये २५० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. या स्फोटानंतर परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी दानिश श्रीलंकेत गेला होता. निगोम्बो शहरातील एका शाळेतील काही विद्यार्थी या स्फोटात मृत्युमुखी पडले होते. त्यांची माहीती काढण्यासाठी दानिश संबंधित शाळेत गेला असता परवानगीशिवाय शाळेच्या आवारात शिरून त्याने तेथे फोटोही काढले होते.

सध्या श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अशावेळी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता तेथील शाळेत मुक्तपणे हिंडल्यामुळे दानिशला ताबडतोब अटक करण्यात आली. तसेच या गुन्ह्यासाठी त्याला १५ मे पर्यंत कोठडीही सुनावण्यात आली होती. सोशल मीडिया आणि अन्य भारतीय प्रसारमाध्यमांतून त्याच्या सुटकेची मागणी जोर धरत होती. अखेर दोन दिवसांनंतर ओळख पटल्यामुळे श्रीलंकन सरकारने त्याची सुटका केली आहे.

Add Comment

Protected Content