जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीत बंद घर फोडून ६५ हजार रूपये लांबविणारा तिसरा संशयित आरोपीला आज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश उर्फ आप्प्या सुनिल नागपूरे रा. रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या तिसऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. यापुर्वी या गुन्ह्यातील विशाल मुरलीधर दाभाडे (वय-२०) आणि विशाल किशोर मराठे (वय-२०) रा. रामेश्वर कॉलनी यांनी ३० जुलै रोजी रात्री अटक केली होती. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगरात राहणारे सिताराम देला राठोड (वय-४२) यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी ५ मे २०२१ रोजी मध्यरात्री फोडून घरातील ६५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार ६ मे रोजी उघडकीला आला होता. याप्रकरणी सिताराम राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्याकडे देण्यात आला होता. या घरफोडीतील विशाल मुरलीधर दाभाडे आणि विशाल किशोर मराठे यांना दोन दिवसांपुर्वीच अटक केली होता. तर तिसरा फरार असलेला संशयित आरोपी आकाश उर्फ आप्या सुनिल नागपुरे रा. रामेश्वर कॉलनी याला आज रविवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा हजार रूपये जप्त करण्यात आले आहे. उद्या सोमवारी २ ऑगस्ट रोजी तिसऱ्या संशयिताला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.