जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणारा संशयित आरोपी कृष्णा महादेव गोरे (वय-२४) रा. स्वामी समर्थ शाळेजवळ कुसुंबे ता.जि.जळगाव याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण येथून मंगळवारी ४ जानेवारी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. १० जुन २०२१ रोजी संशयित आरोपी कृष्णा महादेव गोरे याने लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी हा अल्पवयीन मुलीसोबत कल्याण येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, किशोर राठोड, रणजित जाधाव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, योगीता पाचपांडे, मुरलीधर बारी असे पथक तात्काळ कल्याण येथे रवाना झाले. पथकाने मंगळवारी ४ जानेवारी रोजी सकाळी कारवाई करत संशयित आरोपी कृष्णा महादेव गोरे आणि पीडीत अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. सायंकाळी पोलीसांनी संशयित आरोपीला भुसावळ तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, संशयित आरोपी कृष्णा महादेव गोरे याने यापुर्वी २०१९ मध्ये याचपध्दतीने जळगाव शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी दिली आहे.