जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.
रोहीत भिकन मराठे (वय- १९, रा. धोबी गल्ली, कासमवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘दसर्याच्या दिवशी सुनिल राठोड व गौरव चौधरी यांच्यात भांडण झाले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होवून कारवाई झाली होती. दोन महिन्यापुर्वी ११ मार्च रोजी सुनिल हा लॉन्ड्रीवर कपडे घेण्यासाठी गेला असता, त्यावेळी सोनू चौधरी, गौरव चौधरी, रोहित भिकन मराठे हे हातात कोयता घेवून त्यांच्या घराजवळ फिरुन राठोड यांना खून्नस देत होते.
शनिवारी १४ मार्च रोजी सुनिल हा त्या परिसरातील पांडूरंग सपकाळे यांच्या लॉंन्ड्रीवरुन इस्त्रीचे कपडे घेवून फोनवर बोलत घराकडे जात होता. यावेळी मागून येवून सोनू गोपाल चौधरी, रोहित भिकन मराठे हे हातात कोयता घेवून येत त्याने सुनिल याच्या डोक्यावर वार करीत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान; या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी रोहित मराठे हा दोन महिन्यानंतर कासमवाडीत आला असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील यांनी शनिवारी १४ मे रोजी रात्री कासमवाडी परिसरातून अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.