जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर ठिकठिकाणी अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीसह पिडीत मुलीला पोलीसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतले आहे. अटकेतील संशयिताला गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० जुलै पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. समाधान दंगल पाटील (वय-२५) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणारा समाधान पाटील याने ५ जुलै रोजी रात्री ११ वाजता पिडीत मुलीला फूस लावून दुचाकीने पळवून नेले. त्यानंती चोपडा येथून लक्झरीने सुरत येथे गेले. तिथे नातेवाईकांकडे १० ते १२ दिवस राहिल्यानंतर समाधान पाटील याने मुलीला लक्झरीने शिर्डी येथे घेवून गेला. त्या ठिकाणी एका झोपडीत राहून तिच्यावर अत्याचार केला. २५ जुलै रेाजी दोघेजण शिर्डी बसस्थानकात असतांना शिर्डी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरूवारी २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी समाधान पाटील याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० जुलै पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.