नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करीत लग्नाचे आमिष देत, मैत्रिणीवर अत्याचार करून पैसे उकळणाऱ्या ३२ वर्षीय युवकाला नंदनवन पोलिसांनी अटक केली.
प्रसाद तेजराव कावळे (वय ३२, रा. विद्यानगर, पांधनरोड, नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे. तो शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्जिकल इन्स्टुमेंटची विक्री करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद आणि ३१ वर्षीय पिडिता यांची २०१२ ला भेट झाली. नंतर मैत्री झाली. दोघांनीही प्रेमाचा आणाभाका घेतल्या.
त्यानंतर पीडितेची बदली झाल्याने ती पुण्यात राहण्यासाठी गेली. तिच्यापाठोपाठ प्रसादही नोकरीच्या बहाण्याने पुण्यात आला. दोघेही काही वर्षे पुणे येथे एकाच घरात ‘लिव्ह इन’मध्ये राहिले. यादरम्यान त्याने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवीत, तिच्या वारंवार अत्याचार केले. विविध कारणे देत, तिच्याकडून १० लाख ७३ हजार रुपये घेतले. मात्र, काही दिवसांनंतर त्याने लग्नास टाळाटाळ सुरू केली.
त्यामुळे पीडिताने त्याला पैसे परत मागितले. त्याने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. दरम्यान त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याची माहितीही समोर येताच, पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, त्याला अटक केली.