मुंबई (वृत्तसंस्था) टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीविरुद्ध पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. पत्नी हसीन जहाँने शमीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे.
क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. सरेंडरसाठी त्याला कोर्टाने १५ दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र शमीविरोधात आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर या दोघांचाही वाद चव्हाट्यावर आला. मोहम्मद शमी, त्याचा भाऊ, त्याची आई हे आपला छळ करत असल्याचाही आरोपही हसीन जहाँने केला होता. पैशांसाठी आपल्याला उपाशी ठेवले गेले, माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता. आता या सगळ्या प्रकरणात कोर्टाने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, यावर अद्याप शमीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीय.