अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाहनाच्या धडकेत वन्यजीवांचा अपघात ही वन्यजीव संरक्षणातील जागतिक समस्या आहे. संरक्षित क्षेत्रालगतच्या भागात किंवा सामान्य रस्त्यावरील आणि महामार्गांवर होणारे विविध वन्यप्राण्यांचे मृत्यू होतात. अमरावती येथील कूला वाइल्ड फाउंडेशन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर केलेल्या अभ्यासाची नोंद युरोपिअन जर्नल ऑफ इकॉलॉजी येथे घेण्यात आली आहे.
या शोधपत्रिकेत त्यांचा अभ्यास स्विकारण्यात आला असून लवकरच प्रकाशित होणार आहे. अमरावती येथील मंदार पावगी, डॉ. योगेश जोशी, डॉ. सावन देशमुख, अनुप पुरोहित आणि केदार पावगी यांनी तो सादर केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते यावर काम करत आहेत. २०१८ मध्ये तपशिल संकलित करण्यासाठी नागरिक विज्ञान कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कूला वाइल्ड फाउंडेशन यांनी अँड्रॉइड भ्रमणध्वनीसाठी एक विनामूल्य ‘आर्म’ भ्रमणध्वनी ॲप आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आर्म डॉट ओआरजी डॉट इन हे संकेतस्थळ सुरू केले.२०२१-२२ मध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय, ग्रामीण इत्यादी रस्त्यांचे संपूर्ण जाळे व्यापून सुमारे दहा हजार किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे पद्धतशीर सर्वेक्षण केले. संपूर्ण जिल्हा स्तरावर वन्यप्राणी रस्ते अपघात तपशील गोळा करण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता.