पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूरसह परिसरातील गावांना पुन्हा एकदा अवकाळी वादळी पावसाचा फटका बसला असून यामुळे अनेकांची मोठी आर्थिक हानी झाल्याचे दिसून येत आहे.
येथे आणि परिसरात सलग पाचव्या दिवशी पहूर गारपीट सह परिसरात वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळी वार्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अजिंठा पेट्रोल पंपाचे शेड कोसळले. यात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. तथापि, कोसळलेल्या शेड खाली दोन मोटरसायकली दबल्याने नुकसान झाले. तसेच, बस स्थानकावरील शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या शिवकृपा टी सेंटरचे तसेच सह्याद्री हॉटेलचे पत्रे उडाली.
वादळी वार्यामुळे विज खांब वाकले असून वीजतारा लोमकळलेल्या स्थितीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मुस्लिम कब्रस्तान येथे सुरू असलेल्या कॉम्प्लेक्सच्या भिंती खचून गेल्या. रविवारी झालेल्या गारपिटीने शेतकरी बांधवांचे तसेच वीटभट्ट्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापून ठेवलेला मका आणि ज्वारी असाच पाऊस काही दिवस राहिल्यास कणसावरच उगवून येते की काय ? अशी भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.



