धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक गावातील ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकास खुंटाला आहे, तसेच ६१ लाखांचा निधी असून देखील गावातील विकास कामे होत नाही. दरम्यान काम न करणाऱ्या ग्रामसेवकाची तातडीने बदली करण्यात यावी या मागणीसाठी वराड गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीला टाळे टोकून धरणगाव पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांना अधिकाऱ्यांना जाब विचारत मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतीचे मकरंद सैंदाणे यांची गेल्या दोन वर्षांपासून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय गावाच्या विकासासाठी शासनाकडून ६१ लाख रूपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. परंतू मकरंद सैंदाणे हे नेहमी कामावर न येणे, वेळेवर कामा न करणे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे गावातील अस्वच्छता असून गटारी तुडूंब भरलेल्या आहे. शिवाय गावातील विकास कामे देखील थांबले आहे. तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना कोणतीही माहिती न देता दप्तर घेवून जाणे असा प्रकार होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट गुरूवारी २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता वराड बुद्रुक ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले, तसेच पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांना निवेदन देवून काम न करणाऱ्या ग्रामसेवकाची बदली करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.