मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे-लोंढे प्रकल्पासाठी राज्य मंत्रीमंडळाने आज तब्बल 1275 कोटी 78 लक्ष रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण यांनी पुन्हा एकदा मतदारसंघातील मोठ्या प्रकल्पासाठी निधी खेचून आणला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे-लोंढे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी 1275 कोटी 78 लक्ष रूपयांच्या निधीला मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. हा निर्णय जलसंपदा खात्याच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रयत्न फलदायी ठरले आहेत.
जाणून घ्या वरखडे-लोंढे प्रकल्पाची माहिती
वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्प गिरणा नदीवर वरखेडे बु. या गावापासून एक किलोमिटर व चाळीसगाव पासून 25 किलोमीटर अतंरावर आहे. या धरणासाठी धरण पाया व बुडीत क्षेत्रासाठी एकूण 787 हेक्टर जमीनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. यात खाजगी जमीन 289.56 हेक्टर, सरकारी जमीन 402.49 हेक्टर, वनजमीन 094.95 हेक्टर आहे. धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 5936.28 चौ.की.मी. आहे. उपयुक्त जलसाठा 34.77 द.ल.घ.मी(1.23 टी.एम.सी.) आहे. तर मृतसाठा 0.82 द.ल.घ.मी. (0.03 टी.एम.सी) इतका आहे. वरखेडे धरण हे मातीचे व व्दारसहीत सांडवा प्रकारचे आहे. धरणाची एकूण लांबी 0730 मीटर आहे. वरखेडे-लोढे धरण पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्र सुजलाम सुफलाम होईल.