


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवीन सहकार पदवी अभ्यासक्रमाला मान्यता दिली असून, यामुळे सहकार क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही माहिती विद्यापीठाचे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी दिली.
सहकार क्षेत्रात प्रशिक्षित आणि गुणवत्तापूर्ण पदवीधारकांची वाढती गरज लक्षात घेऊन विद्यापीठात स्वतंत्र सहकार पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी विद्यापीठाच्या सिनेट अधिवेशनात मांडला होता. या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांनी त्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. अभ्यासक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र ननवरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, जगताप मॅडम आणि प्राचार्य जगदीश पाटील यांचा समावेश होता. समितीने अभ्यासक्रमाची रचना तयार करून पुढील कार्यवाही पूर्ण केली. या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठाच्या अभ्यास परिषदेत अखेर या अभ्यासक्रमाला अधिकृत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सहकार विषयात पदवी शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, सहकारी बँका, साखर कारखाने, पतसंस्था, सूतगिरण्या, दूध संघ तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये प्रशिक्षित पदवीधारकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्यासह रोजगाराभिमुख शिक्षण मिळेल. या अभ्यासक्रमाला मान्यता मिळवून देण्यासाठी कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र ननवरे, कुलसचिव विनोद पाटील, अमोल नाना पाटील, सहकार प्रशिक्षण केंद्र साताराचे अध्यक्ष संजय बिर्ला, उपाध्यक्ष शरद जाधव तसेच जगताप मॅडम यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले.सहकारी संस्था अधिक सक्षम करणे, सहकार क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे आणि युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या अभ्यासक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



