जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुभूती विद्यानिकेतन आणि अनुभूती बाल निकेतनने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या ‘दिवाळी मेळा 2025’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलांनी स्वबळावर तयार केलेल्या खाद्यपदार्थ, हस्तकला आणि कलात्मक वस्तूंच्या 21 स्टॉल्सच्या माध्यमातून त्यांनी आपले उद्योजकीय कौशल्य दाखवून दिले.
या मेळाव्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता 1 चे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी सादर केलेल्या स्टॉल्समध्ये क्राऊन कॉर्नर, टेनी टेन्ट, सिंधी प्राऊड, आर दिवाळी किट, फ्रुटी ज्यूस, वी-क्री फन अ मेला, क्राफ्ट कॉर्नर, क्युट कॉर्नर अशा नावांनी स्वतःचा ब्रँड तयार करत उत्पादनांची मांडणी केली होती. प्रत्येक स्टॉलसाठी लोगो, नाव, उत्पादनांची किंमत आणि विक्री ही प्रक्रिया मुलांनीच सांभाळली. यामध्ये पालकांचा सहकार्य व मार्गदर्शनही लाभले.

उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, डॉ. भावना जैन, सौ. शोभना जैन यांच्यासह निशा जैन, अंबिका जैन आणि प्राचार्य मनोज परमार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गुरुवंदना व नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सादर केलेले नृत्यही लक्षणीय ठरले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी व्यावहारिक अनुभवातून वित्तीय साक्षरता, संवाद कौशल्य, योजना आखणे, सर्जनशीलता आणि जबाबदारी या गोष्टी आत्मसात केल्या. प्रत्येक कृतीमागे एक उद्देश व शिकवण होती, जी त्यांच्या भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहे.
मेळाव्याचे आकर्षण ठरलेले ‘लकी ड्रॉ’ विजेते घोषित करण्यात आले आणि त्यांच्या पारितोषिकांचे वितरण शोभना जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आहान यांच्या आईने पालकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. अंबिका जैन यांनी आभार मानले आणि पुढील काळात असेच उपक्रम अधिक भव्य स्वरूपात घेण्याचे संकेत दिले.
निशा जैन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “उद्योजकीय वृत्ती ही केवळ व्यवसाय नव्हे तर जीवनशैली आहे. तिचे बीज बालपणीच पेरले गेले पाहिजे. हा मेळा त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
प्राचार्य मनोज परमार यांनी स्पष्ट केले की, “पर्यावरणाशी सुसंगत आर्थिक विकास साधण्यासाठी आणि ‘सार्थक करूया जन्माचे रूप, पालटू वसुंधरेचे’ या भवरलालजी जैन यांचा विचार ध्यानात घेऊनच अशा उपक्रमांची रचना करण्यात येते.”



