जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा – २०२५ मध्ये अनुभूती निवासी स्कूलने आपले वर्चस्व सिद्ध करत एकूण पाच पदके पटकावली. यामध्ये तीन सुवर्ण, एक रजत आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे. १८ ऑगस्ट रोजी अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडानुभूतीमधील बॅडमिंटन हॉल येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका क्रीडा प्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी इतर शाळांचे क्रीडा शिक्षकही उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील २८ संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता, ज्यामुळे स्पर्धेतील चुरस वाढली होती. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या मान्यतेने, तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या सहकार्याने या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या.

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड आणि अनुभूती स्कूल यांच्या वतीने सुवर्ण, रजत आणि कांस्यपदके प्रदान करण्यात आली. अनुभूती निवासी स्कूलच्या खेळाडूंनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघाने प्रथम स्थान पटकावत सुवर्ण पदके मिळवली. तसेच, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने द्वितीय स्थान प्राप्त करत रजत पदक जिंकले, तर १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
विजयी खेळाडूंना जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, मंजूषा भिडे, कुलदीप पांडे, मनीषा देशमुख, राहुल, किशोर सिंह, दीपिका ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पदके देऊन गौरवण्यात आले. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंह आणि दीपिका ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी जाजिब शेख, कोनिका पाटील, दिव्यांश बैद, पूनम ठाकूर, सोमाणी यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर समीर शेख, विकास बारी, शुभम पाटील यांच्यासह अनुभूती स्कूल व जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.



