Home क्राईम ब्रेकींग : पत्नीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला; पतीने घेतली धावत्या रेल्वेखाली उडी !

ब्रेकींग : पत्नीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला; पतीने घेतली धावत्या रेल्वेखाली उडी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बोरनार येथे दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. या घटनेमुळे बोरनार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनार येथील प्लॉट एरिया परिसरात आनंदा महारू धनगर वय ४२ हे आपल्या पत्नी रेखा आणि विनोद आणि पप्पू या दोन मुलांसह वास्तव्याला होते. मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता आंनदा यांचे पत्नी रेखासोबत किरकोळ वाद झाला. या वादातून आनंदाने पत्नी रेखा यांच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात रेखा धनगर गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पत्नीवर हल्ला केल्यानंतर आनंदा धनगर यांनी सकाळी ७ वाजता थेट म्हसावद रेल्वे गेटजवळ येवून धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पती-पत्नीमधील या टोकाच्या वादामुळे आणि पतीने घेतलेल्या या आत्मघातकी पावलामुळे परिसरातील नागरिक हादरले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound