शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरूड यांच्या उपस्थितीत अँटीजेन चाचण्यांना प्रारंभ करण्यात आला.
तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता, प्रांताधिकारी सौ. दिपमाला चौरे यांनी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रॅपिड अँटेजीन टेस्ट घ्याव्यात असे आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमिवर, शेंदूर्णी प्राथमिक रुग्णालयात अँटीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माजी जि. प. सदस्य संजय गरूड यांच्या उपस्थीतीत चाचण्यांना प्रारंभ झाला.
शेंदुर्णी व परिसरातील कोरोना संशयित नागरिकांना चाचणीसाठी पहुर,जामनेर,पाचोरा व जळगाव अशी भटकंती करावी लागत होती पाचोरा, जामनेर व पहुर नंतर अँटीजेन चाचणी सुविधा शेंदूर्णी येथे उपलब्ध करण्यात आल्यामुळे संशयित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भटकंती थांबली आहे. रुग्णांच्या रॅपिड टेस्ट चाचण्या येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातच होणार असल्याने रुग्णांना दिलासा दिल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांनी जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी व आरोग्य विभागाचे आभार मानले आहेत.
यावेळी कळमसरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अक्षय पाटील व शेंदूर्णी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी गणेशपुर तांडा येथिल बाधिताच्या कुंटूबातील ५ सदस्यांचे नमुने घेऊन चाचणी केली. यामध्ये पहील्याच दिवशी तीन कोरोना बाधीत आढळून आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रविंद्र गुजर, विलास अहिरे, दिग्विजय सूर्यवंशी, संतोष महाले उपस्थीत होते तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकिय अधिकारी डॉ सागर पाटील, पर्यवेक्षक गजानन माळी, सेविका आरती पाटील,शोभा घाटे, फार्मासिस्ट बी. एम. मुर्तडकर सर्व आरोग्य सेविका,सेवक, कर्मचारी आदींनी सहकार्य केले.