पीएमसी बँक प्रकरणी आणखी एक बळी, खातेधारकाचा मृत्यू

pmc 1

मुंबई प्रतिनिधी । पंजाब ॲड महाराष्ट्र बँकेचे (पीएमसी) खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एका खातेधारकाचा बळी गेला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत खाते असलेले ग्राहक संजय गुलाटी यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला २४ तासही उलटत नाहीत तोच आज दुपारी मुलुंड येथील ६१ वर्षीय खातेधारक फट्टोमल पंजाबी यांना मृत्यूने गाठले. बँकेवरील निर्बंधांमुळे प्रचंड तणावाखाली असलेल्या फट्टोमल यांना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या गोकुळ रुग्णालयात नेले मात्र तिथे तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट झाले. फट्टोमल हे आज बँकेत जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. फट्टोमल यांना विकास आणि गीता (विवाहित) अशी दोन मुलं असून मार्च महिन्यात पत्नीचं निधन झाल्यानंतर ते घरात एकटेच राहत होते, असे त्यांचे बंधू दीपक पंजाबी यांनी सांगितले. फट्टोमल हे फट्टू म्हणून परिचित होते. सचखंड दरबार गुरुद्वार आणि जवळच्या झुलेलाल मंदिरातही सेवा करायचे. एक सज्जन माणूस आमच्यातून गेल्याची भावना त्यांच्या सहकारी कोमल पंजवानी यांनी व्यक्त केल्या. फट्टोमल यांच्या खात्यात ८ ते १० लाख रुपये होते. ही त्यांच्या आयुष्याची कमाई होती, अशी माहिती गुरीज्योत सिंग यांनी दिली.

घोटाळ्याच्या विळख्यात अडकलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यानंतर या बँकेच्या प्रामाणिक खातेदारांवर मोठा आघात झाला असून आपली आयुष्याची कमाई बुडाल्याच्या भीतीने खातेधारक व त्यांचे कुटुंबीय गलितगात्र झाले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन दिवसांत या बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या संकटाला वेगळंच वळण लागलं आहे.

Protected Content