रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू कोरोना साथीपेक्षाही गंभीर — गडकरी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशात रस्ते अपघातात  होणारे मृत्यू कोरोना महामारीपेक्षाही चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.

 

रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

 

आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते अपघातांच्या घटनांबाबत काळजी व्यक्त केली. गडकरी म्हणाले,”रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांपैकी १८ ते ४५ या वयोगटातील काम करणाऱ्या व्यक्तीचं प्रमाणे ७० टक्के आहे. देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही परिस्थिती कोरोना महामारीपेक्षाही जास्त गंभीर आणि पुढील काळात ही परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते,” असं गडकरी म्हणाले.

 

“रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता देशातील ४० हजार किमी राष्ट्रीय महामार्गांचा सेफ्टी ऑडिटमध्ये समावेश करण्यात आला आहे. या महामार्गांचं ऑडिट करून त्यातील चुका आणि उणीव शोधून काढण्यात येतील. दुरूस्त करण्यात येईल. हे दुर्दैव आहे की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतानंतर अमेरिका आणि चीनचा क्रमाक लागतो. परिवहन मंत्री म्हणून या गोष्टीबद्दल मी खूप संवेदनशील आणि गंभीर आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले.

 

वाढत्या रस्ते अपघातांवरून गडकरी यांनी डीपीआर तयार करणाऱ्यांना फैलावर घेतलं. “अनेक रस्त्यांच्या योजना चुकीच्या आणि सदोष असून, शेकडो तांत्रिक उणीवा देखील आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अपघाताचे स्पॉट तयार होतात. डीपीआर सक्षम प्राधिकरणाकडून तपासले जायला हवेत आणि त्यात बदल केले जायला पाहिजे, तटस्थ एजन्सी आणि शैक्षणिक संस्थांकडून हे बघितले गेलं पाहिजे,” असं गडकरी म्हणाले.

Protected Content