जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) भाविकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना’ जाहीर केली आहे. या नव्या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना महत्त्वाच्या धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांना कमी खर्चात व सुरक्षित पद्धतीने भेट देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः भाविकांना, परवडणाऱ्या दरात धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनाचा अनुभव देणे हा आहे. एसटी महामंडळामार्फत ज्या सामाजिक सवलती यापूर्वी प्रवासासाठी लागू होत्या, त्या सर्व सवलती या तीर्थाटन योजनेतही लागू राहणार असल्याने प्रवाशांना दुहेरी लाभ मिळणार आहे.

महिलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या ‘अमृत महोत्सव योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या तीर्थाटन योजनेत पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वृद्ध नागरिकांसाठी तीर्थदर्शन अधिक सुलभ आणि आनंददायी ठरणार आहे.
योजनेत गटप्रवासालाही विशेष महत्त्व देण्यात आले असून, ४० प्रवाशांचा गट असल्यास त्यांच्या मागणीनुसार निवडलेल्या तीर्थक्षेत्रासाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे भाविक मंडळे, सामाजिक संस्था तसेच कुटुंबीयांना एकत्रित प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.
या तीर्थाटन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. अष्टविनायक दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, साडेतीन शक्तीपीठे, अक्कलकोट आणि पंढरपूर वारी यांसारख्या धार्मिक स्थळांबरोबरच राज्यातील ऐतिहासिक किल्ले, कोकणातील सागरी पर्यटनस्थळे, थंड हवेची ठिकाणे तसेच ताडोबा व चिखलदरा यांसारखी अभयारण्येही या योजनेतून पाहता येणार आहेत.
या योजनेत प्रवासाचा खर्च कमीत कमी ठेवण्यात आला असून, निवास, चहा-नाश्ता व भोजनाची व्यवस्था प्रवाशांना स्वतःच्या खर्चाने करावी लागणार आहे. मात्र, मुक्कामाच्या ठिकाणी अडचण आल्यास एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रवाशांना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी, या योजनेचा लाभ घेऊन आपल्या लाडक्या दैवतांचे दर्शन व पर्यटनस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांनी केले आहे.



