रावेर-शालिक महाजन | दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी घेतलेल्या अन्नपूर्णा सिंग यांची कहाणी ही जिद्द, मेहनत आणि अपयशावर मात करण्याची साक्ष आहे. सुरुवातीला त्यांना बंगळुरू येथील एका खाजगी बँकेत नोकरी मिळाली होती. मात्र, त्यांच्या मनात आयपीएस अधिकारी होण्याची प्रबळ इच्छा होती, त्यामुळे त्यांनी ही नोकरी स्विकारली नाही.
अन्नपूर्णा सिंग यांनी घरीच बसून यूपीएससीची तयारी करण्यास सुरुवात केली. पहिले दोन प्रयत्न असफल ठरले. २०१७ आणि २०१८ या वर्षांत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, त्या निराश न होता, निर्धाराने अभ्यास सुरूच ठेवला. अखेर, २०१९ मध्ये त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि त्यांनी ऑल इंडिया १९४वी रँक मिळवून आयपीएस अधिकारी पदाची योग्यता सिद्ध केली.
फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अन्नपूर्णा सिंग यांनी यश मिळवण्यासाठीची जिद्द दाखवून दिली. त्यांच्या या यशस्वी प्रवासातून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. त्यांच्या कुटुंबाचे देखील या प्रवासात मोलाचे योगदान आहे. वडील दिल्लीतील सरकारी नोकरीत कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. त्यांच्या भावाने देखील खाजगी क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
“लाईव ट्रेंड्स न्यूज”शी संवाद साधताना अन्नपूर्णा सिंग यांनी युवकांना संदेश दिला की, शिक्षणाच्या माध्यमातून सरकारी सेवांमध्ये किंवा खाजगी क्षेत्रात उच्च पदावर पोहोचण्यासाठी प्रर्यत्न करावेत. त्याच बरोबर, त्यांनी देशातील वाढत्या शिक्षणाच्या तणावा बाबत चिंता व्यक्त केली आणि पालकांना मुलांवर अवास्तव दडपण न आणता त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची मुभा द्यावी, असा सल्ला दिला.
अन्नपूर्णा सिंग यांची कहाणी ही फक्त त्यांचा संघर्ष नव्हे तर यशाचा एक अद्वितीय अनुभव आहे.सोशल मिडिया पासून दूर राहणाऱ्या अन्नपूर्णा सिंग या जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून देशातील युवकांना एक नवी दिशा दिली आहे.