अहमदनगर वृत्तसंस्था । राळेगणसिद्धी येथे आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत हजारे यांनी पवारांना क्लीन चीट दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘माझ्याकडं आलेल्या पुराव्यानुसार शरद पवार यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही. परंतु अजित पवार यांचे या प्रकरणात नाव आहे. ईडीने शरद पवार यांचे नाव कसे काय घेतले याची चौकशी पुढे होईल. सहकारी कारखाण्यासाठी बँकेतून करोडो रुपयांचे कर्ज घेतले गेले. मात्र त्यानंतर कारखान्यांनी बँकांना पैसे परत दिले नाही. त्यामुळं बँकांनी कारखान्यांवर जप्ती आणली व बँकेनं कवडीमोल भावाने ते कारखाने विकले. यातच मला शंका आहे की, कारखाने आजारी पडले की पाडले गेले. सीआयडीचे अधिकारी जय जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी न करता दोन ओळीत या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे मला या प्रकरणात अधिका-यांचे देखील हात असल्याची शंका येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार आहे’ असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.