जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील शेती रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिल्यामुळे शेतकर्यांना आपल्या शेत-शिवारात जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे पालकमंत्र्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी ना. गुलाबराव पाटील यांचा थेट त्यांच्यामुळे तयार झालेल्या खेडी ते आव्हाणे रस्त्यावरच सत्कार केला.
कुणा मान्यवराचा सत्कार हा एखादा कार्यक्रम, लहान-मोठे फंक्शन; निवास, ऑफीस, विश्रामगृह आदी ठिकाणी होत असल्याचे आपल्याला माहित आहे….मात्र भर रस्त्यात आणि तो देखील मंत्र्यांचा सत्कार झाल्यावर आपला विश्वास बसणार नाही. तथापि, ही बाब प्रत्यक्षात खेडी ते आव्हाणे या मार्गावर घडली. ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेती रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिल्यामुळे शेतकर्यांना आपल्या शेत-शिवारात जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे पालकमंत्र्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिसरातील शेतकर्यांनी ना. गुलाबराव पाटील यांचा थेट त्यांच्यामुळे तयार झालेल्या रस्त्यावरच सत्कार केला. शेतकर्यांचे प्रेम पाहून पालकमंत्री भारावले. तर परिसरात हा एकच चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याची पाहणी करून याच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यात पहिल्यांदाच पालकमंत्री शेत-पाणंद रस्ता योजना राबविली. याच्या अंतर्गत शिवारांना जोडणार्या रस्त्यांचे बळकटीकरण करण्यात आले. इतिहासात पहिल्यांदाच शिवारांना जोडणारे रस्ते तयार करण्यात आल्याने या योजनेचे कौतुक करण्यात आले. राज्य सरकारने व्यापक प्रमाणात ही योजना स्वीकारून नोव्हेंबर महिन्यात मातोश्री शेत-पाणंद रस्ते योजना या नावाने राज्यभरात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात तर आता डांबरीकरणाचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे ना. गुलाबराव पाटील यांच्यामुळे राज्यातील शेत-शिवारांचे रस्ते हे पहिल्यांदाच खर्या अर्थाने कनेक्ट होणार आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ही योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. आव्हाणे तसेच परिसरातील शिवारे देखील याच्या माध्यमातून जोडण्यात आलेली आहेत.
दरम्यान, पालकमंत्री गुरूवारी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आटोपल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता आव्हाणे ते खेडी दरम्यान परिसरातील शेतकर्यांनी ना. गुलाबराव पाटील यांचा शेत रस्त्यावरच हृद्य सत्कार केला. याप्रसंगी भारावलेले ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोणत्याही राजकारण्याच्या आयुष्यात अनेक सत्कार येत असतात. यानुसार माझ्याही आजवरच्या कारकिर्दीत असंख्य सत्कार सोहळे आलेत. मात्र आज मी केलेल्या रस्त्यावरच उभे राहून बळीराजाने केलेला सत्कार हा आपण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. मातोश्री शेत-पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून आता जळगाव ग्रामीण मतदारसंघासह जिल्ह्यातील शिवारांना जोडणार्या रस्त्यांचे डांबरीकरण होणार असून नियोजन मंडळाच्या माध्यमातून याच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.
ना. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास सह गिरणा पुलासह शहरातून जाणार्या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील केली. गिरणा पुलाच्या कामाला गती देण्याची सूचना त्यांनी न्हाईच्या अधिकार्यांना दिली. याप्रसंगी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता सौ. रूपा राऊळ-गिरासे, कार्यकारी अभियंता यळाई, सहायक अभियंता श्रेणी-अ सुभाष राऊत, जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ढिवरे, उपअभियंता नंदू पवार, शाखा अभियंता संदीप शेलार, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण अर्थात न्हाईचे कार्यकारी अभियंता सिन्हा आणि त्यांच्या सहकारी उपस्थित होते.