…आणि आठवलेंमुळे नाथाभाऊ व मंगेशदादा आमने-सामने !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणारे आमदार एकनाथराव खडसे आणि आमदार मंगेश चव्हाण हे आज चाळीसगावात योगायोगाने आमने-सामने आले. याला निमित्त ठरले केंद्रीय मंत्री रामदास आठवले !

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर आहेत. आज सकाळी ते शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये दाखल झाले. याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे हे आठवले यांच्या भेटला गेले. याच प्रसंगी चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण हे देखील तेथे पोहचले. यामुळे आठवलेंच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा सामना झाला.

आमदार मंगेश चव्हाण यांनी सातत्याने एकनाथराव खडसे यांच्यावर टिका केली आहे. विशेष करून दुध संघाच्या आखाड्यात या दोन्ही मान्यवरांमध्ये जोरदार कुस्ती रंगली. यात मंगेश चव्हाण यांनी थेट मुक्ताईनगरातून मंदाताई खडसे यांच्या विरूध्द अर्ज भरून त्यांना पराभूत केले. यानंतर चव्हाण यांच्याकडे दुध संघाची धुरा आल्यानंतर त्यांनी येथील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेतलेले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज आकस्मीक का होईना दोन्ही नेते रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आमने-सामने आले. अर्थात, त्यांच्यात फारशी चर्चा झाली नाहीच. तथापि, या योगायोगाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Protected Content