अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले; दोन तरूणाचा जागीच करूण अंत !


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा-लासुर रस्त्यावरील मामलदे फाट्याजवळ १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात मामलदे येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय-२५) आणि पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय-२३) अशी अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मामलदे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे दोघे तरुण चोपडा शहरातील कामे आटोपून आपल्या दुचाकीने मामलदे गावाकडे परतत होते. चोपडा-मामलदे फाटाच्या दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारला. अचानक कट मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट समोरील वाहनावर आदळली. हा अपघात इतका गंभीर होता की, अमोल पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच मामलदे, चुंचाळे आणि चोपडा शहरातील अनेक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चोपडा शहर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळ गाठले आणि अपघातातील दोन्ही जखमी तरुणांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची बातमी समजताच मामलदे आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली. एकाच वेळी दोन तरुण मित्रांच्या निधनामुळे रुग्णालयात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला गहिवरून आले होते. पोलीस नाईक महेंद्र साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनधारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन तरुण वयाच्या मुलांचे असे अकाली निधन झाल्याने मामलदे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनधारकाचा शोध सुरू केला असून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.