जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समोरील वाहनांना ओव्हरटेक करीत जाणार्या भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वंदना शामराव शिंदे (वय-४२, रा. जारगाव, ता. पाचोरा) या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडवाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील वंदना शामराव शिंदे या महिला त्यांचा मोठा मुलाचा मित्र समाधान मेहेर याच्यासोबत जळगावातील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुलाला भेटण्यासाठी बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आल्या होत्या. मुलाला भेटल्यानंतर माघारी पाचोराकडे दुचाकीने जाण्यासाठी दुपारी दीड वाजेच्या सुमारास निघाल्या. रामदेववाडीपासून काही अंतरावर त्या रस्त्याच्या बाजूला पाणी पिण्यासाठी थांबल्या. पाणी पिल्यानंतर त्या जाण्यासाठी दुचाकीवर बसल्या असता. मागून ओव्हरटेक करीत भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, वंदना शिंदे या रस्त्याच्याकडेला फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. रस्त्यावरील नागरीकांना तात्काळ धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.