जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कस्तूरी हॉटेलच्या मागे असलेल्या राम नगरात पैसे न देण्याच्या कारणावरून एका तरूणाला शिवीगाळ करत लोखंडी पट्टी डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी २२ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली होती. याप्रकरणी गुरूवारी २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश नानू पाटोळकर वय २१ रा. रामनगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २२ जुलै रोजी रात्री ११ वाजता हा त्यांच्या घरी असतांना संशयित आरोपी लोकेश सोनार रा. रामनगर याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी दिनेशने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही. याचा राग आल्याने लोकेशने शिवीगाळ करत हातातील लोखंडी पट्टी डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या दिनेशला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून मारहाण करणारा लोकश सोनार याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.




