जळगाव प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकात डंपरने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द गंभीर जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी घडली होती. आज पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बुधा खंडू बनसोडे (वय ७०, रा.महादेव मंदीराजवळ, व्यंकटेश नगर, हरिविठ्ठल नगर) हे शहरात हमालीचे काम करतात . मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता काम आटोपून घराकडे स्वातंत्र्य चौकातून पायी जात होते. त्यावेळी भास्कर मार्केटकडून अमृत योजनेचे डंपर (एमएच १९ झेड २५३४) भरधाव वेगाने आले व बुधा वनसोडे यांना जोरदार धडक दिली. यात ते रस्त्यावर पडले. त्यामुळे डंपरचे पुढचे चाक बनसोडे यांच्या उजव्या पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. दरम्यान याचवेळी पाऊसही सुरू होता. या घटनेमुळे प्रचंड धावपळ व वाहतूकीची कोंडी झाली होती. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश पाटील व उमेश ठाकून यांनी अपघातस्थळी धाव घेवून जखमी झालेले बनसोडे यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलीस हंसराज देशमुख व मोहसीन खान यांनी डंपर चालकाला ताब्यात घेवून जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले
दरम्यान जखमी बनसोडे हे जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शोभाबाई, मुलगा अरूण, तीन विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी मयत बुधा बनसोडे यांच्या फिर्यादीवरून डंपरचालकावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे करीत आहे.