भिंत अंगावर पडून मृत पावलेल्या महिलेच्या वारसाला धनादेश प्रदान

पाचोरा, प्रतिनिधी | संततधार पावसाने मृत झालेल्या सुमनबाई यादव या महिलेच्या वारसांना शासकीय मदतीच्या स्वरूपात मिळालेला चार लाख रूपयांच्या रकमेचा धनादेश नगराध्यक्ष संजय गोहिल यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

सततच्या पावसामुळे भिंत अंगावर पडल्यामुळे गेल्या ७ सप्टेंबर २०२१ रोजी मृत्युमुखी पडलेल्या पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील महिला सुमनबाई यादव माळवे (वय – ६५) यांचे वारस असलेल्या विवाहित मुलगी यमुना दिपक शिरसाळे यांना शासनाच्या नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मयत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणार्‍या आर्थिक सहाय्यातुन चार लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेशाचे वाटप करण्यात आले. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी अवघ्या तीन आठवड्यात बाधित कुटुंबाला मदत मिळाल्याचे समाधान कुटुंबियांच्या चेहर्‍यावर दिसून आले.

हा कार्यक्रमा तहसिल कार्यालयात दि. २८ मंगळवारी दुपारी १२ वाजता झालेल्या या कार्यक्रमात नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रवीण ब्राह्मणे, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, शहर तलाठी आर. डी. पाटील, लिपिक अमोल भोई, हिरामण भोसले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. दरम्यान शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी केले.

संततधार पावसामुळे सुमनबाई यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्यांचा दुर्दवी मृत्यू ओढवला होता. याबाबतची महिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश देऊन मदतीसाठीचा प्रस्ताव शासनदरबारी सादर करण्याचा सूचना प्रशासनास दिल्या होत्या त्या अंतर्गत महसूल प्रशासनाने देखील तत्परता दाखवत तात्काळ प्रस्ताव सादर केल्याने अवघ्या तीनच आठवड्यात शासकीय मदत मिळाली. यासाठी तहसिलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, शहर तलाठी आर. डी. पाटील, लिपीक अमोल भोई यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content