जळगाव ,प्रतिनिधी । आगामी विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत अद्यापही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार यादीत आपले नांव नोंदविता यावे. यासाठी निवडणूक आयोगाने आणखी संधी दिली असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर झाला आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गाडीलकर बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात, नायब तहसीलदार श्री. कळसकर उपस्थित होते. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत, मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १५ ते ३० जुलै या दरम्यान राबविण्यात येणार आहे. यानुसार १५ जुलै रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात आली आहे. तर १५ ते ३० जुलै या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहे. तसेच २० व २१ आणि २७ व २८ जुलै, २०१९ या तारखांना मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ऑगस्ट रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.तरी मतदार याद्यांच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी सक्रीय सहभाग नोंदवून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९साठी मतदार याद्या अचूक व परिपूर्ण होण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते असेही श्री. गाडीलकर यांनी सांगितले.