यावल-अय्यूब पटेल | आज लागलेल्या यावल तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत दणदणीत यश संपादन करून भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. जिल्हा दुध संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ सहकारातील तिसर्या महत्वाच्या संस्थेवर महायुतीचा झेंडा रोवून त्यांनी महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला आहे.
काल यावल तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली असून आज याची मतमोजणी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीचा एक उमेदवार हा आधीच बिनविरोध झाला होता. तर आज १६ पैकी १५ जागा आणि एकूण १७ पैकी १६ जागा जिंकून महायुतीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला. तर महाविकास आघाडी प्रणीत पॅनलला अवघी एक जागा ती देखील फक्त दोन मतांनी जिंकल्याचे समाधान मिळाले. या विजयासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी सहकार्य केले. यात ना. गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाबभाऊ पाटील व ना. अनिलदादा पाटील यांचे भक्कम पाठबळ लाभले. मात्र या विजयाचे खरे शिल्पकार ठरले तर भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे ! त्यांनीच प्रत्यक्ष ग्राऊंड लेव्हलवरून नेतृत्व करतांना एकतर्फी विजय संपादन केला.
सहकार क्षेत्र आणि त्यात देखील यावल तालुका म्हटला की कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला मानला जात असे. भाजपला भलेही राजकीय यश मिळाले असले तरी सहकारात येथे बर्याचदा कॉंग्रेस सरस ठरत असे. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र बदलले. याचा प्रारंभ झाला तो जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीपासून ! यावल तालुका म्हणजे केळी उत्पादक आणि सामाजिकदृष्टीने म्हटल्यास लेवा पाटीदार समाजाचा गड होय. यामुळे येथे आधी नाथाभाऊंना भक्कम पाठींबा मिळत होता. मात्र दुध संघात इतिहास घडला. येथून खडसेंच्या सौभाग्यवतींना कमी मते मिळाल्याने त्यांचा पराजय झाला. तसेच तालुक्यातून महायुतीचा उमेदवार निवडून आला.
यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही महायुतीने दणकेबाज विजय प्राप्त केला. यानंतर शेतकी संघात विजयाची हॅटट्रीक साजरी करतांना महाविकास आघाडी व त्यातही कॉंग्रेसच्या वर्चस्वाला जबर धक्का दिला आहे.
यावल तालुक्यात भारतीय जनता पक्षाने राजकीय यश मिळवतांनाच सहकारावरही आपली पकड मजबूत केली आहे. एकीकडे अनेक मान्यवरांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यामुळे पक्षाला बळकटी आलेली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील अतिशय सलोख्याचे संबंध येथे दिसून येत असल्याची बाब देखील लक्षणीय मानली जात आहे.
यातच महायुतीने विजयाची हॅटट्रीक साजरी केली आहे. तर, आधीपासून तालुक्याचे नेतृत्व करतांना अमोल जावळे यांनी जिल्हाध्यक्ष बनल्यावरही विजयरथ कायम ठेवत तिसर्यांदा अतिशय दिमाखदार विजय मिळविला आहे. जामनेरचा अपवाद वगळता जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात इतक्या एकतर्फी पध्दतीत लागोपाठ तीन विजय कुणा नेत्याला देखील मिळवता न आल्याची बाब ही अमोल जावळेंच्या यशाचे महत्व अजून मोठ्या पध्दतीत दर्शविणारी ठरली आहे.