मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे राज्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी २३ जानेवारीला मुंबईत मनसेचे पहिले महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अमित ठाकरे यापुढे राजकारणातील सक्रिय होणार असल्याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘मनसे’च्या या अधिवेशनाच्या निमित्ताने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे आता राजकीय भूमिका बदलण्याचा तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात राज आणि फडणवीस यांच्या गुप्त बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात मनसे आणि भाजप असे समीकरण राज्याच्या राजाकारणात पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना ‘राज’पुत्राच्या राजकारणातील एण्ट्रीने पक्षाला नवचैतन्य आणि युवा नेतृत्त्व देण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
मनसे झेंड्याचा रंग बदलणार?
अमित ठाकरे यांनी याआधी मनसेच्या काही आंदोलनात सहभाग घेतला होता. नवी मुंबईत महापालिका कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या मागण्यांविरोधात थाळीनाद मोर्चा मनसेने काढला होता. या मोर्चाचे नेतृत्त्व अमित ठाकरे यांनी केले होते. तसेच रेल्वे आणि आरेतील कारशेडच्या मुद्द्यावरुनही अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभांना अमित ठाकरे आवर्जुन उपस्थित असतात. मात्र, व्यासपीठावरुन त्यांना सक्रियपणे भाषण केलेले नाही. आता २३ जानेवारीच्या पक्षाच्या अधिवेशनातही अमित ठाकरे व्यासपीठावर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.