Home Cities बोदवड बोदवडमध्ये दिवाळी खरेदीच्या ऐन धामधुमीत अंधाराचे साम्राज्य; पथदिवे वेळेवर सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त!

बोदवडमध्ये दिवाळी खरेदीच्या ऐन धामधुमीत अंधाराचे साम्राज्य; पथदिवे वेळेवर सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त!

0
बोदवडमध्ये दिवाळी खरेदीच्या ऐन धामधुमीत अंधाराचे साम्राज्य; पथदिवे वेळेवर सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त!

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बोदवड शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असतानाच, दुसरीकडे बाजारपेठेतील स्ट्रीट लाईट वेळेवर सुरू होत नसल्याची गंभीर समस्या समोर आली आहे. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे संध्याकाळी लवकर अंधार पडत असतानाही रस्त्यावरील दिवे उशिरा सुरू होत असल्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सध्या संध्याकाळी साधारण ५:४५ वाजेपासूनच अंधार पडण्यास सुरुवात होते, परंतु बोदवड बाजारपेठेतील स्ट्रीट लाईट रात्री ६:३० वाजेपर्यंत सुरू होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत महिला, लहान मुले, वृद्ध तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. अशा गर्दीच्या वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि चोरांच्या भीतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, नगरपंचायत प्रशासनाला आठवण करून दिल्यानंतरच दिवे सुरू केले जात असल्याने शहरातील मूलभूत सुविधांच्या नियोजनावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नगरपंचायतीकडून नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे अपेक्षित असताना, साधी स्ट्रीट लाईट वेळेवर सुरू ठेवण्यासाठीही नागरिकांना किंवा पदाधिकाऱ्यांना वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी नागरिकांनी तक्रारी करायच्या का, असा संतप्त सवाल बोदवड शहरविकास आघाडीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. नगरपंचायतीने कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता दररोज ठराविक वेळेत स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी स्वयंचलित वा नियमित यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात मुख्य बाजारपेठच अंधारात राहत असेल, तर नगरपंचायत प्रशासनाने याची तातडीने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बोदवड शहरविकास आघाडीने या प्रकरणी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील पथदिव्यांची तातडीने तपासणी करून प्रकाशव्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.