अमळनेर : ईश्वर महाजन
जळगाव जिल्ह्यात आघाडी असली तरी अमळनेर विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवेल, असा दावा कॉंग्रेसच्या जिल्हा प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी नुकताच अमळनेरमध्ये कार्यक्रमात केला होता. डॉ. पाटील यांच्या दाव्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संभ्रमात पडले आहेत. अमळनेरची जागा राष्ट्रवादी लढणार असल्याचे निश्चित असतांना कॉंग्रेसकडून आलेले वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रकार असल्याचे मानले जात आहे. कारण कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, अजबराव पाटील यांच्या उपस्थितीतच डॉ.पाटील यांनी ही माहिती दिलीय. तसं बघितलं तर अमळनेरची जागा नैसर्गिकरित्या कॉंग्रेसची आहे. परंतु गतवेळी राष्ट्रवादीला कॉंग्रेसपेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे ही जागा कॉंग्रेसला सुटण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे डॉ.पाटील यांच्या वक्तव्याला राजकीय गोटात फार महत्व दिले जात नाहीय. यंदाची निवडणूक तिरंगी नव्हे तर,भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करताय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी नेमकी कुणाला उमेदवारी देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे. आजच्या घडीला मतदार संघातील राष्ट्रवादी-भाजपची या दोन्ही पक्षांची राजकीय स्थिती लक्षात घेता, माजी आमदार साहेबराव पाटील हे दोघं पक्षाच्या राजकीय समीकरणात अगदी फिट बसताय. म्हणूनच साहेबराव पाटील यांच्या भूमिकेवर आगामी विधानसभा निवडणुकीचं सर्व गणित अवलंबून असणार आहे.
विदयामान आमदार शिरीषदादा चौधरी हे भाजपाचे सहयोगी सदस्य असले तरी भाजप पक्षाकडून उमेदवारी मिळेल का? का अपक्ष म्हणून निवडून लढवतील त्यानीही अमळनेर मतदार संघात विकास कामाचा धडाका लावला आहे. त्यांनीही ग्रामीण व शहरी भागातील विकासाची घौडदौड सुरूच आहे.परंतु सध्या अमळनेर मतदार कोणाला आमदार करतील या घडीला कठीण असले तरी येणारी निवडणूक भाजप व राष्ट्रवादी यांच्यात लढत राहील हे निश्चित.मागे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ट नेते ना.अरूणभाई गुजराथी यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांना पक्षात येण्यासाठी स्वागत आहे होते. त्यामुळे माजी आमदार साहेबराव पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवली तर यश निश्चितच आहे, अशी चर्चा लोकामध्ये सध्यातरी आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाने अनिल भाईदास पाटील यांना खासदारकी लढविण्यासाठी तयार केल्याने साहेबरावदादा यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. अनिल भाईदास पाटील यांच्या घरी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आल्याने राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे. अनिल पाटील व पक्षातील कार्यकर्ते सध्या ग्रामीण भागात संपर्क सुरु केला आहे. परंतु तरी देखील आमदार शिरीषदादा चौधरी व माजी आमदार साहेबरावदादा पाटील यांच्यातच चुरसीची निवडणूक होईल,अशीच चर्चा सुरु आहे.
भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत रंगण्याची शक्यता
सध्या अमळनेर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवन बांधण्याच्या भूमीपूजन सोहळयाला आजी व माजी दोन्ही आमदारांनी भूमीपूजन सोहळयाला पुर्णवेळ उपस्थिती होते. पत्रकार भवनासाठी दोघांनी केलेले सहकार्य बघता दोघे दादामधील संबध सध्या चांगले असल्याचे दिसून येत आहे. राजकारणात कोणताही शत्रू कायमचा शत्रू राहत नाही, या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले होते. परंतु दोघे आजी व माजी आमदारांच्या मनात काय आहे हे येणारा काळ सांगेल. जळगाव जिल्ह्यात सध्या अमळनेर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक चुरस आणि संभ्रमाचे वातावरण आहे. विधानसभेसाठी माजी आमदार साहेबराव पाटील,भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ,राष्ट्रवादीकडून अनिल भाईदास पाटील तर कॉंग्रेसकडून अॅड.ललिता पाटील यांचे नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे इच्छुक वगळता विद्यमान आमदार शिरीष चौधरी,साहेबरावदादा व श्री. वाघ हे तिघं जण आजच्या घडीला भाजपच्या गोटात आहे. गतवेळी राष्ट्रवादीचा उमेदवाराला कॉंग्रेसपेक्षा अधिक मत मिळाल्यामुळे त्यामुळे अमळनेरची जागा कॉंग्रेसला सुटण्याची चिन्हं कमीच आहेत. म्हणून या मतदार संघात गतवेळी प्रमाणे तिरंगी नव्हे तर, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत रंगण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे विद्यमान अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले असल्यामुळे ते यंदा भाजपकडून उमेदवारी मागू शकतात. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे लोकसभेसाठी इच्छुक म्हणत असले तरी त्यांचा जीव अमळनेर विधानसभा मतदार संघातच अडकलाय,हे सर्वश्रुत आहे. त्याच पद्धतीने माजी आमदार साहेबराव पाटील हे देखील सध्या भाजपात आहेत. तसेच त्यांच्या धर्मपत्नी लोकनियुक्त पुष्पलताताई नगराध्यक्ष असल्यामुळे उमेदवारीवरील त्यांचा दावा या दोघांपेक्षा अधिक आहे,हे मान्यच करावे लागेल. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी स्मिताताई या विधान परिषदेच्या आमदार असल्यामुळे एकाच घरात पक्ष दोन आमदार कसे देईल? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी शिरीष चौधरी किंवा साहेबराव पाटील यांच्यापैकी कुणाला तरी एकाला उमेदवारी देण्याची अधिक शक्यता आहे.
‘गोल्डन चान्स’ कुणाला?
आमदार शिरीष चौधरी यांनी तालुक्यातील विकास केली असली तरी मतदार त्यांना पुन्हा संधी देतील का?या प्रश्नाचे उत्तर देणे सध्या कठीण आहे. माजी आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटील मागील पंचवार्षिक निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे त्यांच्याबद्दल आजच्या घडीला मतदार संघात सहानभूती आहे. त्यांनी केलेली ठोस कामे आजही मतदार विसरले नाहीत. तसेच त्यांच्या पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी विविध कामांना सुरुवात करत जनमानसात पुन्हा एकदा आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एवढेच नव्हे तर, मराठा समाजासह इतर समाजातील प्रतिमा व नातंगोते लक्षात घेता, भाजपकडून साहेबराव पाटील यांच्याच नावाला अधिक पसंती मिळण्याची शक्यता असल्याचे भाजपमधीलच काही जण सांगताय. परंतु स्थानिक भाजपातील एका गटाकडून त्यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता वर्तविली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने अनिल पाटील यांना लोकसभा लढावयाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ते विधानसभेच्या स्पर्धेतून आपसूकच बाद झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला आता विधानसभेसाठी उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे. आजच्या घडीला राष्ट्रवादीकडे अनिल पाटील यांच्या व्यतिरिक्त तगडा उमेदवार नाहीय. साहेबराव पाटील यांचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेता,राष्ट्रवादीकडून अनिल पाटील यांना लोकसभा लढवल्यानंतर विधानसभेला कमकूवत उमेदवार देऊन साहेबराव पाटील यांचीच सोय केली जाणार असल्याची देखील चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, ऐनवेळी अजित पवार हे राजकीय खेळी खेळून साहेबराव पाटील यांनाच राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याचा आग्रह करू शकतात. एकंदरीत सर्व घडामोडी लक्षात घेता माजी आमदार साहेबराव पाटील यांना सर्वच बाजूने ‘गोल्डन चान्स’आहे. खरं म्हणजे आजच्या घडीला सर्व राजकीय घडामोडी साहेबराव पाटील यांच्याच पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांचेच पारडे जड दिसतेय,बाकी येणार काळच सांगेल की, अमळनेरचा आमदार यंदा कोण असेल?
कोणत्या पक्षाकडून कोण इच्छुक?
आजच्या घडीला सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे आहेत. त्यात विद्यमान आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळविण्यावर त्यांचा भर असेल. नंदुरबारमधून शिरीष चौधरी यांचे मोठे बंधू डॉ.रवींद्र चौधरी यांनी भाजपाकडूच निवडणूक लढविली होती. तर माही आमदार साहेबराव पाटील हे देखील भाजपचे संभाव्य उमेदवार असून शकतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या माधास्थितीने भाजपात प्रवेश केला होता. तसेच त्यांच्या पत्नी पुष्पलता पाटील या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीवर त्यांचा दावा तगडा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे लोकसभेसाठी इच्छुक असले तरी ऐनवेळी त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते विधानसभा लढविण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरू शकतात. तर राष्ट्रवादीकडून तूर्त अनिल पाटील हेच लोकसभा व विधानसभेसाठी आग्रही आहेत. परंतु ऐनवेळी साहेबराव पाटील देखील राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात.
२००९ व २०१४ विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मते?
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत साहेबराव पाटील (अपक्ष ) यांना ५५,०८४ तर अनिल भाईदास पाटील (भाजप) ४४,६२१ अॅड. ललिता पाटील (काँग्रेस) २५,६०९, डॉ. बी. एस. पाटील (अपक्ष) १०,४२२ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिरीष चौधरी(अपक्ष) ६८१४९, अनिल भाईदास पाटील (भाजप) ४६,९१०,साहेबराव पाटील (राष्ट्रवादी)४३,६६७ मते मिळाली होती.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाला किती मते?
भाजप ९४,६००
राष्ट्रवादी काँग्रेस ४३,०५६
भौगोलिक रचना
अमळनेर विधानसभा मतदार संघात २००९ च्यावेळी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत पारोळा तालुक्यातील ४७ गावे या मतदार संघात समाविष्ट झाली. त्यासह अमळनेर तालुक्यातील १५२ गावे मिळून एकूण १९९ गावे या मतदारसंघात आहेत. एकूण ३०० मतदानकेंद्र आहेत. या मतदारसंघात भाजपचे १९९५ पासून सलग तीनवेळा भाजपचे डॉ. बी. एस. पाटील आमदार म्हणून निवडून आले होते, त्याच्या आधी समाजवादी विचारसरणीचे साथी गुलाबराव पाटील यांनीही तीन वेळा आमदारकी भूषवली आहे. भाजपचा पगडा असलेल्या या मतदारसंघात आपापली स्वत:ची हक्काची वोटबँक,‘राष्ट्रवादी’चा निष्ठावान गट आणि अन्य उमेदवारांमुळे होणाऱ्या मतविभाजनाच्या गणितावर शिरीष चौधरी किंवा साहेबराव पाटील यांचे विजयाचे समीकरण ठरणार आहे.
मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न
अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. प्रताप मिल बंद तर ‘विप्रो’अखेरचा श्वास घेत आहेत. अमळनेर शहराचा पाण्याचा प्रश्न भीषण. सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा. पाडळसे धरणाचे काम अजूनही पूर्णपणे मार्गी लागलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी.