अमळनेर प्रतिनिधी- शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याची दखल घेऊन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली.
तालुक्यात डेंग्यूचे सात रुग्ण आढळल्याने कोरोनाच्या भीतीच्या सावटातून मुक्त होत नाहीत तोपर्यंत जनतेत डेंग्यूची भीती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी आपल्या दालनात बैठक घेतली. ठिकठिकाणी फवारणी , धुरळणी करावी , नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करावे , कंटेनर तपासणी करावी , जेथून पाण्याचा निचरा करता येणे शक्य नाही अशा डबक्यांमध्ये ,नाल्यांमध्ये ऑइल, औषध टाकून डेंग्यूच्या डासांचा नायनाट करावा , नियमित साफसफाई करण्यात यावी आणि नागरिकांत जनजागृती करावी असे आदेश दिले. या बैठकीस ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ प्रकाश ताळे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी ,किशोर माळी, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, डॉ राजेंद्र शेलकर हजर होते.