अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तीन सावकारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून एका मुद्रांक विक्रेत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
अमळनेर येथील प्रकाश हरचंद बडगुजर हे मुद्रांक विक्रेते म्हणून व्यवसाय करतात. ११ रोजी त्यांनी सुसाईड नोट पोलिसांसह त्यांच्या काही मित्रांना सोशल मीडियावरून शेअर केली. यानंतर त्यांनी लागलीच शौचालयात जाऊन हाताची नस कापून घेतली. दरम्यान, ही सुसाईड नोट पाहताच हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर यांनी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती कळवली. हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण कुमावत, नीलेश मोरे यांनी बडगुजर यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे मुद्रांक विक्रेत्याचे प्राण वाचले असले तरी या प्रकरणी संबंधीत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता होत आहे. बडगुजर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये तीन सावकारांची नावे लिहली असल्याने सावकारीचा मुद्दा देखील चर्चेत आला आहे.