अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या दौर्याआधीच शिवसेनेला जिल्ह्यात धक्का बसला आहे. अमळनेरच्या शहरप्रमुखांसह विविध महत्वाच्या पदाधिकार्यांनी आज आपापल्या पदांचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. या माध्यमातून आता पदाधिकार्यांचा शिंदे गटाकडे ओघ सुरू झाल्याचे दिसून आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आणि शिवसेना समर्थक एक अशा पाचही आमदारांनी शिंदे गटाची साथ घेतली आहे. यात गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. जळगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा जिल्हा म्हणून ओळख असतांना येथील सर्व आमदार शिंदे गटात जाणे हा शिवसेनेला आधाच मोठा धक्का होता. या पाठोपाठ जिल्ह्यातील विविध पदाधिकारी हे शिंदे गटात दाखल होत आहेत. यात आज अमळनेर तालुक्यातील पदाधिकार्यांनी आपापले राजीनामे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपुर्द करून ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
अमळनेर येथील शिवसेनेचे शहर प्रमुख संजय कौतिक पाटील व तालुका संघटक महेश देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या सोबत अमळनेर तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनीही प्रवेश घेतला आहे. तत्पूर्वी शहर प्रमुख संजय पाटील व तालुका संघटक महेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांचेकडे सादर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केल्याची जाहीर केले .गुलाब भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी संजय कौतिक पाटील व महेश देशमुख ,लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.