अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विठ्ठल नामाच्या गजरात येथील संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या पायी वारीचे तुळशीबागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असणारी संत सखाराम महाराज वाडी संस्थानची पायी दिंडी बुधवारी प्रसाद महाराज यांच्या नेतृत्त्वात मार्गस्थ झाली. पहाटे सहा वाजता वाडी संस्थानातून येथील पैलाड भागातील तुळशीबागेत प्रसाद महाराजांचे आगमन झाले. याठिकाणी त्यांच्याहस्ते विठुरायाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करण्यात आले. यानंतर हरीनामाच्या गजरात पायी दिंडी निघाली. अमळनेर ते पंढरपूर हा २२ दिवसांचा ५५० किमीचा प्रवास पूर्ण करुन शुक्रवारी निघालेली पायी वारी ८ जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे.
संत सखाराम महाराज यांची दिंडी ही आडगाव, भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागद, बेलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाणा, टाकळी, राजेराय, दौलताबाद, वाळुज, महारूळ, बीडकिन ढोरकीन, पैठण, शेवगाव, चितळी, पाथर्डी, माणिकदवंडी, धामणगाव, कडा, आष्टी, जवळा, करमाळा, अरणगाव, नात्रज, करमाळा, निंभोरे, वडशीवणे, सापटणे, करकममार्गे दिंडी पंढरपूरला पोहचणार आहे. तर या वारीचा काल बुधवारचा पहिला मुक्काम पारोळा येथे झाला.