अमळनेर प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वरणगाव येथील राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याची ग्वाही गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आज दिली. ते अमळनेर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, हतनूर-वरणगाव येथे राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ १३०३ ) प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाली असली तरी त्याचे काम रखडले होते. यानंतर जून महिन्यात नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुडसगाव येथे हे प्रशिक्षण केंद्र स्थलांतरीत करण्यास राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने पाठपुरावा करून हा अध्यादेश रद्द करून हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथेच करण्यास मंजुरी मिळवली होती. या संदर्भात दिनांक ९ जुलै) २०२० रोजी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची बैठक घेण्यास भाग पाडले. यात एसआरपीएफ १३०३ हे प्रशिक्षण केंद्र हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यानंतर हे केंद्र होईल की नाही ? याबाबत संशयकल्लोळ व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमिवर, आज अमळनेरच्या दौर्यावर आले असतांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरणगाव येथेच एसआरपीएफचे प्रशिक्षण केंद्र होणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, कोविड मुळे अनेक कामे राहून गेलेली आहेत. तथापि, आता कामांना गती येणार असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वरणगाव येथे राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
एसआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रांचे आजपर्यंतचे निर्णंय
१) शासन निर्णय ता. २६/१०/१९९४ नुसार वरणगाव येथे नवप्रविष्ठ पोलिस शिपाई यांना मुलगामी प्रशिक्षण देण्यासाठी नवीन पोलिस प्रशिक्षण शाळा (केंद्र) सुरू करण्यास तत्वत: मान्यता.
२) या केंद्रासाठी हातनूर-वरणगाव परिसरातील २२ हेक्टर ९४ आर जमीन पोलिस विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
३) ता. २३/३/१९९९ रोजी निधी मागणीचा सुधारीत प्रस्ताव सरकारला सादर केला होता. मात्र या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यताच नसल्याने १० कोटी निधी मागणीचा प्रस्ताव पोलिस महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत रद्द.
४) ता. १७/०२/२०१० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरणगाव येथे नवीन पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास तत्वत: मान्यत.
५) ता. ०६/०४/२०१० रोजी प्रधान सचिव मेधा गाडगीळ यांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांना नवीन पोलिस प्रशिक्षण विद्यालयाच्या बांधकाम, साहित्य व साधन सामुग्री प्रस्ताव सरकारला सादर करण्याचे निर्देश.
६) ता. १४/०२/२०११ रोजी अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाकडून ६२.६७ कोटी रूपये खर्चाचा सविस्तर प्रस्ताव सरकारला सादर.
७) पोलिस महासंचालक, ता. २६/१०/२०१६ अन्वये व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलिस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्या. वरळी-मुंबई यांना विद्यमान पोलिस प्रशिक्षण विद्यालय ही नवीन पोलिस शिपाई यांना प्रशिक्षण देण्यास सक्षम असून वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र तयार करण्याची आवश्यकता नाही, असा प्रस्ताव सादर.
८) याबाबत विधानसभा अतारांकित प्रश्न क्रमांक ६७६२१ अन्वये वरणगाव येथील नियोजित पोलिस प्रशिक्षण केंद्रबाबत प्रश्न,
९) जळगाव जिल्हा हा अतिसंवेदनशील असून येथे नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्राएवजी डठझऋ ग्रुप उभारल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी तत्काळ उपलब्ध होऊ शकतो, असे लेखी निवेदन सादर.
१०) ता. १३/०९/२०१९ च्या सरकारी निर्णयानुसार पोलिस प्रशिक्षण केंद्राऐवजी डठझऋ ग्रुप (राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१९) स्थापन करण्यास तत्वत: मान्यता.
११) ता. २६/०६/२०२० सरकारी निर्णयानुसार राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१९ हातनूर-वरणगाव येथे स्थापन करण्याऐवजी मंजूर पदांसह व मंजूर आवर्ती/अनावर्ती खर्चासह कुसडगाव ता. जामखेड जि. नगर येथे स्थापन करण्यास मान्यता.
१२) ता. ९/७/२०२० राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक प्रशिक्षण केंद्र हतनूर-वरणगाव येथे स्थापन करण्याबाबत पोलिस उच्चस्तरीय बैठकीत निर्णय.