नियम मोडणार्‍यांविरुद्ध कारवाई करा : साहेबराव पाटील

अमळनेर प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले आहे. यात म्हटले आहे की, जिल्ह्यात १ जून सकाळी ७ पर्यंत निर्बंध लागू असून संचारबंदीचे देखील आदेश आहेत. असे असतानाही सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातील बातम्यांवरून जिल्ह्यात विवाह समारंभ, राजकीय बैठका, विविध शासकीय नीमशासकीय कर्मचार्‍यांचे आंदोलन, निवेदने, विविध विकास कामांची उद्घाटने, भूमीपूजन, सत्कार समारंभ, पुरस्कार वितरण, समाजिक, धार्मिक आदी कार्यक्रम गर्दीत होताना दिसत आहेत.

यात पुढे नमूद केले आहे की, एकीकडे प्रशासन सामान्य जनतेवर, फेरीवाले, विक्रेते, दुकानदार यांच्यावर कारवाई करत असताना शासकीय, नीमशासकीय कर्मचारी तथा राजकीय पदाधिकारी अनेकदा मास्क न लावता, डिस्टन्स न पाळता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे बातम्यांमध्ये प्रकाशित कार्यक्रमातील फोटो हाच पुरावा मानून कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे, संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी या निवेदनात केली आहे.

Protected Content