सात्रीकरांच्या आशा पल्लवीत : मात्र शेतकर्‍यांनी घेतल्या हरकती

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सात्री गावकर्‍यांच्या पर्यायी रस्ता मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी या रस्त्यावर १५ शेतकर्‍यांनी हरकती घेतल्यामुळे यात अडचण निर्माण झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशाने सात्री ता. अमळनेर रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने गिरणा पाटचारीची पाहणी ता.१२ रोजी करण्यात आली. व नियोजित रस्त्याचे अंतर मोजमाप करण्यात आले.यामुळे सात्री गावाला पर्यायी रस्त्याची आशा पल्लवीत झाली आहे.यावेळी प्रांतअधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रांजल पाटील, उपअभियंता श्री.वारुळे, कार्यकारीअभियंता निम्न तापी प्रकल्प मुकुंद चौधरी, उपअभियंता व्ही. एस. पाटील, उपअभियंता गिरणा प्रकल्प विलास जाधव , शाखा अभियंता श्री.बारेला ,अमळनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे, शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम योगेश खांबोर,जिल्हा पुनर्वसन समिती अध्यक्ष महेंद्र बोरसे मंडळ अधिकारी एन. आय. कट्यारे, तलाठी पराग पाटील यांची उपस्थित होती.

पर्यायी रस्त्याला १५ शेतकर्‍यांनी घेतली हरकत

यावेळी या रस्त्याची पाहणी करुण मोजमापही करण्यात आले.मात्र या गिरणा पाटचारी मधून रस्ता जाण्यासाठी पंधरा शेतकरीनी हरकती घेतल्या असून त्यात राजेंद्र पाटील, संजय पाटील, विनोद पाटील,मनोहर पाटील, सोपान पाटील, हिरामण पाटील, लोटन पाटील, हिलाल पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील, विश्वास पाटील, रमेश पाटील, संदीप पाटील, राजाराम पाटील, उदयभान बोरसे, यांनी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पाटचारीतून रस्त्याला विरोध केला असून या पाटचारीतून रस्ता दिल्यास सामूहिक उपोषण करू, याचीही शासनाने दखल न घेतल्यास सामूहिक आत्मदहन करू असाही इशारा निवेदनातून दिला आहे.

गेल्या चार वर्षापासून पर्यायी रस्त्याची मागणी

सात्री ता.५ ऑक्टोबर रोजी उपचाराअभावी उषाबाई भिल यांचे निधन झाले होते. नदीला पाणी असल्याने रात्रीच्या वेळी पाण्यातुन तालुक्याच्या ठिकाणी कसे घेऊन जावे असा प्रश्न पडल्याने उषाबाई यांना वेळेवर उपचार मिळाला नाही. असेच मागील वर्षी आरुषी या लहान मुलीला नदीला पूर असल्याने वेळेवर दवाखाण्यात न आणता आल्याने तिचा मृत्यू झाला होता.यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात संताप व्यक्त केला. तर मागील वर्षी थेट आरुषीचे प्रेत तहसील कार्यालयात आणले असता शासनाचा निषेध केला होता. प्रातांधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी सात्री ग्रामस्थांची भेट घेत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुण याबाबत पर्यायी रस्त्याचा मार्ग काढला असून सात्री येथील ग्रामस्थाच्या आशा पल्लवीत झाल्या असून आता या पर्यायी रस्त्याला पंधरा शेतकर्‍यांनी हरकती घेतल्याने अजून ही एक समस्या उभी राहिल्याने सात्री ग्रामस्थांना तालुक्याला येण्यासाठी अजूनही संकटाचा सामना करावा लागेल की, काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

गावाचे दुर्भाग्य आणि न्यायासाठी शासनाकडे याचना -महेंद्र बोरसे

पाडळसरे तापी निम्न प्रकल्प अंतर्गत सात्री गावाचे पुनर्वसनग्रस्त असल्याने गेल्या वीस वर्षापासून या गावाला कुठलाच विकास आराखडा नाही. तर स्वातंत्र्यकाळापूर्वी पासून या गावाला तालुक्यात येण्यासाठी रस्ता नाही. यातच नदीला पूर असला तर नदी ओलांडून जाणार कसे यातच आजारी रुग्ण उपचाराअभावी मृत झाले. सर्वत्र विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना झाल्या मात्र आजही सात्री गाव या पासून कोसो दूर असल्याची खंत आहे. मागील वर्षी आरुषी आणि यावर्षी उषाबाई भिल या दोघीना पावसाळ्यांत नदीला पाणी असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. शासनाने आता पर्यायी रस्त्यासाठी कार्यवाही केली आहे मात्र रस्ता सात्री गावाला जोडला गेल्यावरच माझा शासनाकडे यासाठी पाठपुरावा थांबणार नाही. अन आरुषी सारख्या कोवळ्या जीवाला, व उषाबाई भिल यांच्या सारख्या निरपराध बळी जायला नको असे प्रतिपादन महेंद्र बोरसे यांनी केले आहे.

Protected Content