अमळनेर अमोल पाटील । पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासाठी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील या दाम्पत्याने शहरातून ई-रिक्षाने प्रवास करून नागरिकांना एक सकारात्मक संदेश दिला आहे.
राज्य सरकारने माझी वसुंधरा योजनेअंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी पाऊले उचलायला सुरवात केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून अमळनेर नगरपरीषदेतर्फे प्रत्येक सोमवारी नो-व्हेहिकल डे चे आवाहन नागरिकांना केले जात असून तो दिवस यशस्वीपणे साजरा करण्यात येतो.
या अनुषंगाने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी ई- रिक्षाने प्रवास केला.
यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, नगरपरिषदेचे नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी व शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासाठी नगरपरिषदेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यालाच हातभार लावण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्वत: यातून प्रवास करून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.