अमळनेर प्रतिनिधी । पोलीस खात्याची कथित बदनामी केल्याच्या आरोपातून मुख्यालयात बदली करण्यात आलेल्या कर्मचार्याची बदली मॅटने रद्द केली आहे.
याबाबत वृत्त असे की, पोलिस कर्मचारी मिलिंद अशोक भामरे यांनी पोलिस प्रशासनाशी निगडीत एक बातमी पोलिसांच्या ग्रुपवर पोस्ट केली होती. यामुळे पोलिस प्रशासनाची बदनामी केल्याच ठपका ठेवत, तत्कालीन पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी याप्रकरणी चाळीसगावच्या अप्पर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार अप्पर अधीक्षकांनी भामरे यांचा कसुरी अहवाल पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यामुळे ३० जून २०२० रोजी भामरे यांची बदली जिल्हा मुख्यालयात केली होती.
दरम्यान, मिलींद भामरे यांनी आपली बदली नियमबाह्य पध्दतीत करण्यात आल्याचे नमूद करत मॅट कोर्टात अॅड.व्ही. एच. वाघ आणि अॅड.विठ्ठल दीघे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देत न्या. ए.पी.कुर्हेकर यांनी बदली रद्द केली. तसेच पोलिस अधिकार्यांवर ताशेरे ओढत भामरे यांची पुन्हा अमळनेरात नियुक्ती करण्याचे आदेश दिले. परिणामी मॅटमुळे पोलीस कर्मचार्याला दिलासा मिळाला आहे.